चार वर्षांपूर्वी गडचिरोलीचे आमदार झालेले कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्याकडे ३ कोटीच्या वर मालमत्ता असून भाजपचे उमेदवार माजी आमदार अशोक नेते यांच्याकडे जवळपास १ कोटी २१ लाख १७ हजार ६७६ रुपयांची संपत्ती आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे यांच्याकडे ४३ लाख २५ हजार रुपयांची संपत्ती आहे. मात्र, कोटय़धीश असलेल्या या नेत्यांनी त्यांच्या व्यवसायाचा उल्लेख केलेला नाही.
लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रानुसार आदिवासी, मागास, तसेच नक्षलग्रस्त लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली मतदारसंघातील लोकप्रतिनिधी कोटय़धीश असल्याची माहिती यातून समोर आली आहे. काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांनी जाहीर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार त्यांच्याकडे ५५ लाख १४ हजार ९११ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यांची पत्नी यशोधरा उसेंडी यांच्याकडे १५ लाख ८३ हजार ३५७ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. डॉ. उसेंडी यांच्याकडे विविध ठिकाणी ७१ लाख १५ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, तसेच त्यांच्यावर विविध वित्तीय संस्थांचे जवळपास ९३ लाख ८२ हजार २९९ रुपयांचे कर्ज आहे. डॉ. उसेंडी यांच्याकडे २४ लाख रुपये, महिंद्रा रेक्टर कंपनीचे वाहन आहे. त्यांच्या पत्नी यशोधरा उसेंडी यांच्याकडे इऑन हय़ुंदाई कंपनीचे ३ लाख ६० हजार रुपयांचे वाहन, तसेच ५८ हजार रुपये किंमतीची दुचाकी आहे. डॉ. उसेंडी यांच्याकडे १२० ग्रॅम सोन्याचांदीचे दागिने, तर यशोधरा उसेंडी यांच्याकडे १६० ग्रॅम सोन्याचांदीचे दागिने आहेत. आमदार उसेंडी यांची गडचिरोली, नागपूर, मुंबई येथे स्थावर मालमत्ता असल्याचे त्यांनी विवरणपत्रात नमूद केले आहे. विशेष म्हणजे डॉ.उसेंडी अवघ्या चार वर्षांपूर्वी गडचिरोलीचे आमदार म्हणून निवडून आले आहे. त्यांच्याकडे पारंपरिक श्रीमंती नाही किंवा वडिलोपार्जित व्यवसायही नाही. अशा स्थितीत अवघ्या चार वर्षांत कोटय़वधी होण्याचा बहुमान त्यांनी मिळविलेला आहे. त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रात व्यवसायाचा उल्लेखही नाही.
त्यांच्या पाठोपाठ भाजपचे उमेदवार माजी आमदार अशोक नेते यांच्याकडे ३९ लाख ८ हजार २६ रुपयांची जंगम, तर ७५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांची पत्नी अर्चना यांच्या नावे ६ लाख १८ हजार ६०० व मुलांच्या नावे मिळून एकंदरीत ७ लाख १७ हजार ६५० रुपयांची जंगम मालमत्ता आहे. नेते यांच्याकडे १५ लाख ३६ हजार रुपये किंमतीची स्कॉर्पिओ व अन्य वाहने आहेत. त्यांच्यावर विविध वित्तीय संस्थांचे ५८ लाख ३० हजार ५५० रुपयांचे कर्ज आहे. आम आदमी पार्टीचे उमेदवार माजी राज्यमंत्री डॉ. रमेश गजबे यांच्याकडे ३० लाख ९५ हजार रुपयांची जंगम व १२ लाख ३० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. डॉ. गजबे यांच्यावर विविध संस्थांचे ६९ हजार रुपयांचे कर्ज असल्याने त्यांनी संपत्तीच्या विवरणपत्रात नमूद केले आहे.