प्रचारासाठी अतिशय कमी कालावधी मिळाल्याने कमीत कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल, यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात असून सोमवारी बकरी ईद सणाच्या दिवशी त्याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले. नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर जमलेल्या हजारो मुस्लीम बांधवांना शुभेच्छा देत प्रचार करण्याची संधी बहुतांश उमेदवारांनी साधून घेतली. शुभेच्छाबरोबर प्रचारपत्रके देण्यासाठी उमेदवारांमध्ये चढाओढ लागली. परिणामी, मैदानावर सर्वपक्षीय प्रचार पत्रकांचा खच पडला. ही बाब हेरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबवत सर्वावर कडी करण्याचा प्रयत्न केला.
बकरी ईदच्या पाश्र्वभूमीवर, त्र्यंबक रस्त्यावरील ईदगाह मैदानावर सकाळी खतीब ए शहर हाफिज हिसोमुद्दीन मियाँ खतीब यांच्या नेतृत्वाखाली ईद उल अज्ल्हाचे खास नमाजपठण झाले. या सामूहिक नमाज पठणात दरवर्षी हजारो मुस्लीम बांधव सहभागी होतात. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आलेला हा सण उमेदवारांसाठी प्रचाराचे महत्त्वपूर्ण माध्यम ठरला. विधानसभा निवडणुकीच्या एकूण कार्यक्रमात प्रचारासाठी जेमतेम आठवडाभराचा कालावधी आहे. या काळात प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे हे उमेदवारांसमोरील मुख्य आव्हान आहे. यामुळे जॉगिंग ट्रॅक, मंदिरे व तत्सम ठिकाणे धुंडाळून अधिकाधिक मतदारांच्या गाठभेटी घेण्याचा उमेदवारांचा प्रयत्न आहे. बकरी ईदनिमित्त झालेले सामूहिक नमाज पठणावेळी उमेदवारांनी ही संधी साधून घेतली. नाशिक मध्य मतदारसंघात मुस्लीम बांधवांची संख्या मोठी आहे. या भागातील बांधव ईदगाह मैदानावर नमाज पठणासाठी येतात. ही बाब लक्षात घेऊन मनसेचे उमेदवार वसंत गीते, भाजपच्या प्रा. देवयानी फरांदे, शिवसेनेचे अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे विनायक खैरे या प्रमुख पक्षांचे उमेदवार सकाळपासून मैदानावर दाखल झाले. महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अर्जुन टिळे, भाजपचे सुहास फरांदे आदी उपस्थित होते. मैदानाच्या प्रवेशद्वारावर विविध सामाजिक संघटनांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या. नाशिक पश्चिम मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार दशरथ पाटील यांनी हजेरी लावली. सर्वच उमेदवारांनी शुभेच्छा देताना प्रचारपत्रकही हाती सोपविले. विविध उमेदवारांकडून दिल्या जाणाऱ्या प्रचारपत्रकांमुळे मैदानावर अक्षरश: त्यांचा खच पडला. ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादीने सर्वावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाची स्वच्छता मोहीम राबविली. प्रचारपत्रके उचलून मैदान पूर्ववत केले. या उपक्रमाची छायाचित्रे टिपली जातील याची दक्षता घेतली आणि देशभरात स्वच्छता मोहिमेची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भाजपवर शरसंधान साधले. मतदारांना आकृष्ट करण्यासाठी राजकीय पक्षांनी चालविलेल्या कसरतींमुळे मुस्लीम बांधवही अवाक् झाले.
दरम्यान, नमाज पठणासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला. मैदानासमोरील त्र्यंबक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी लोखंडी जाळ्या लावून नियोजन केले. काही काळ या मार्गावरील वाहतूक थांबविण्यात आली होती.
संग्रहित लेख, दिनांक 7th Oct 2014 रोजी प्रकाशित
निमित्त शुभेच्छांचे, हेतू प्रचाराचा
प्रचारासाठी अतिशय कमी कालावधी मिळाल्याने कमीत कमी काळात अधिकाधिक मतदारांपर्यंत कसे पोहोचता येईल

First published on: 07-10-2014 at 07:40 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election promotions on eid