लोकसभा निवडणुकीसंबंधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अधिकारी व निवडणुकीची थोडक्यात माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रकाशित केली असून ही पुस्तिका उमेदवार, अधिकारी व पत्रकारांना अतिशय उपयुक्त ठरणारी आहे.
या पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस. डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी. बडकेलवार, उपजिल्हाधिकारी निवडणूक दामोधर नान्हे, पुरवठा अधिकारी रमेश आडे व जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते उपस्थित होते. ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१४ संपर्क पुस्तिका व आदर्श आचारसंहिता’ या नावाने प्रकाशित केलेल्या या पुस्तिकेत अतिशय उपयुक्त माहिती देण्यात आली आहे. उमेदवार व अधिकाऱ्यांसाठी लागणारी माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न या पुस्तिकेतून यशस्वीपणे करण्यात आला. जिल्ह्य़ातील विधानसभा मतदारसंघ आणि त्याचे क्षेत्र, विधानसभा मतदारसंघातील मतदारांची आकडेवारी, निवडणूक निरीक्षक खर्च बी. के. मीना यांच्यासह निवडणुकीसंबंधी अधिकारी व त्यांचे संपर्क क्रमांक, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक या पुस्तिकेत देण्यात आले आहेत. मतदान, मतमोजणी केंद्रात प्रवेश, सार्वजनिक सभा व प्रचारबंदी, भित्तीपत्रके, जाहिरात पत्रकांची छपाई, व्हिडिओ चित्रीकरण, आदर्श आचारसंहिता, निवडणुकीसंबंधी गुन्हे व त्यावर कारवाई, लोकप्रतिनिधी कायदा १९५१ व निवडणुकीतील उमेदवारांना सूचना आदी माहिती या पुस्तिकेत समाविष्ट केल्याने ही पुस्तिका अतिशय उपयुक्त झाली आहे. लोकसभा निवडणूक संपर्क पुस्तिका अधिकाऱ्यांना मार्गदर्शन ठरणारी असून या निवडणुकीत घ्याव्या लागणाऱ्या निर्णयासंबंधात दिशादर्शक देणारी आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी तयार केलेली ही पुस्तिका केवळ उपयुक्त नसून संग्राहय़ अशीच आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Mar 2014 रोजी प्रकाशित
निवडणुकीची माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका प्रकाशित
लोकसभा निवडणुकीसंबंधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील अधिकारी व निवडणुकीची थोडक्यात माहिती देणारी उत्कृष्ट पुस्तिका जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रकाशित केली
First published on: 25-03-2014 at 08:16 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elections excellent info bookletpublish