हिंदू नववर्षांनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रांना लाभणारा प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या गुढीपाडव्याच्या यात्रांना यंदा राजकीय रंग चढलाच. शोभायात्रांमध्ये सहभागी होत विविध पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराची राजकीय गुढी उभारण्याची संधी साधत मतदारांवर मोहिनी टाकण्याचाही प्रयत्न केला. मात्र आचारसंहितेचा भंग होऊ नये याची दक्षता बाळगत उमेदवारांनी शोभायात्रांमध्ये उपस्थिती लावल्यानंतर तेथून झटपट काढता पाय घेण्याची खबरदारीही घेतली.
हिंदू नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईत ठिकठिकाणी शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. ढोल-ताशाच्या गजरात निघालेल्या शोभायात्रांमध्ये राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह सहभागी झाले होते. पक्षाचा ध्वज फडकवत, खांद्यावर उपरणे घेतलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची पदयात्रा नेत्यांच्या पाठोपाठ सुरू होती. स्वामी विवेकानंद प्रतिष्ठानतर्फे गिरगावमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागतयात्रेकडे अवघ्या मुंबईकरांचे लक्ष लागलेले असते. अगदी विरार, ठाणे, डोंबिवलीत स्थायिक झालेले गिरगावकर दरवर्षी या यात्रेत आवर्जून सहभागी होतात. परिणामी या स्वागतयात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तमाम गिरगावकर या यात्रेत सहभागी होतात. प्रचाराची ही नामी संधी सर्वपक्षीय उमेदवारांनी दवडली नाही. दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून िरगणात उतरलेल्या ‘आप’च्या उमेदवार मीरा सन्याल, काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा, शिवसेना उमेदवार अरविंद सावंत, मनसे उमेदवार बाळा नांदगावकर आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले होते. मात्र मतदारांना अभिवादन करीत अल्पावधीतच या उमेदवारांनी यात्रेतून काढता पाय घेतला.
उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रिया दत्त, भाजप उमेदवार पूनम महाजन यांनीही आपापल्या परिसरातील शोभायात्रेत भाग घेतला. लेझीमपथकाचा ढोल वाजवत, फुगडय़ा घालत पूनम महाजन यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त समोर येताच पूनम महाजन यांनी त्यांना आलिंगन देत नववर्षांच्या शुभेच्छाही दिल्या. मुंबईतील इतर मतदारसंघाच्या आखाडय़ात उतरलेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी गुढीपाडव्याच्या यात्रेची ही संधी सोडली नाही. काही उमेदवार यात्रेत सहभागी झालेल्यांचे तोंडभरून कौतुक करीत होते, तर काही बघ्यांची विचारपूस करीत त्यांच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करीत होते.