कार्यक्षेत्राबाहेरील ऊस मिळविण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जादा भावाची स्पर्धा सुरू केली आहे. मात्र एकीकडे अधिक भाव देताना दुसरीकडे काही कारखाने त्यातून छुप्या पद्धतीने वेगवेगळय़ा कपाती करीत आहेत. हे गौडबंगाल उघड झाल्याने ऊस उत्पादकांचे आíथक नुकसान होण्याचीच शक्यता अधिक आहे.
जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्याचे बॉयलर पेटलेले आहेत. तर काही कारखान्याचे बॉयलर पेटण्याच्या मार्गावर आहेत. काही साखर कारखाने आíथक तरतुदीअभावी किंवा उसाअभावी बंद राहणार आहेत. दिवाळीच्या दरम्यान जिल्ह्यातील सर्वच कारखान्याच्या गळीत हंगामास सुरुवात होईल. मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे व आíथक तरतूद न झाल्याने जिल्ह्यातील काही कारखाने बंद होते. या वर्षीही हे कारखाने बंद राहणार आहेत. अशा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसावर अनेक कारखान्यांचा डोळा आहे. कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध नसलेल्या कारखान्यांनी बंद असलेल्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस मिळविण्याकरिता ऊसदराची स्पर्धा सुरू केली आहे.
ज्या कारखान्यांनी जादा दराचे आमिष दाखविले आहेत असे कारखाने ऊसदरातून छुप्या कपाती करताना दिसतात. त्यामध्ये दर टनी कपात, भागविकास, ऊसविकास, भविष्यनिर्वाह निधी, ठेव, तीस किलोमीटरवरील वाहतूक अशा वेगवेगळय़ा कपाती होतात. काही कारखाने उसाच्या जातीच्या नावाखाली कपाती लादून जाहीर केलेला भाव शेतकऱ्यांच्या हातात पडूच देत नाही. अंतिम पेमेंट हातात आल्यानंतरच आपली धूळफेक झाल्याचे लक्षात येते.
यंदा जिल्ह्यातील सर्व धरणे भरलेली असल्याने उसाची लागवड मोठय़ा प्रमाणावर होईल असे चित्र आहे. साखर उद्योग निसर्गावर अवलंबून आहे. ज्या वर्षी पाऊस पाणी भरपूर होतो कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस उपलब्ध होतो. त्या वेळेला काही कारखाने उसासाठी बाहेर पडत नाहीत, मात्र अतिरिक्त ऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांची हेळसांड होते. प्रसंगी शेतकऱ्यांना कारखान्याचे उंबरठे झिजवावे लागतात. त्याचाही आíथक भरुदड शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतो.
दुष्काळ असो किंवा नसो वर्षांनुवर्षे जो कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उपलब्ध असतानाही केवळ बाहेरील शेतकऱ्यांचा ऊस घेऊन त्यांचे हित जोपासण्याचे काम करीत आहे. परंतु कारखान्यांच्या छुप्या कपाती आता शेतकऱ्यांच्या लक्षात येऊ लागल्याने भावाच्या मागे न पळता वर्षांनुवर्षे मदत करणाऱ्या कारखान्यांनाच ऊस देण्याकडेही शेतकऱ्यांचा कल आहे.