वाहन चालविण्याचा बनावट परवाना बनवून देणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रविवारी अटक केली असून त्यांच्याकडे मुंब्रा पोलीस आणि आरटीओ असे दोन विभागांचे रबरी शिक्के आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली आहेत.
महमद इजास रियाजउद्दीन (४०) आणि मोहम्मद सिकंदर अब्दुल शेख (३६), अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते मुंब्रा भागात राहतात. आरटीओने २००७ पासून बुकलेट वाहन परवाना बंद करून त्याऐवजी स्मार्टकार्ड देण्यास सुरुवात केली आहे. असे असतानाही दोघेजण बनावट बुकलेट वाहन परवाना तयार करून देण्याचे काम करीत होते. याबाबत ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घाग आणि त्यांच्या पथकाने मुंब्रा परिसरात सापळा रचून दोघांना अटक केली. या प्रकरणी शिळ-डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 पाच हजारांत बनावट परवाना
महमद आणि मोहम्मद या दोघांची फोनवर मैत्री झाली आणि त्यानंतर त्यांनी बनावट वाहन परवाना बनविण्याचा उद्योग सुरू केला. ते एका बनावट वाहन परवान्यासाठी पाच ते सहा हजार रुपये घेत होते.
त्यांच्याकडे सापडलेल्या बनावट परवान्यावर रायगड आरटीओ विभागाचे शिक्के असून त्यावर अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. वाहन परवान्यावर शिक्के मारून त्यावर स्वत: स्वाक्षऱ्या केल्याची कबुली दोघांनी दिली. मात्र असे असले तरी, या प्रकरणाचा सविस्तर तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत घाग यांनी दिली.