सिद्धेश्वर पॅटर्नची फलश्रुती
कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांचे प्रबोधन होते, हा उद्देश समोर ठेवून ग्रामदैवत सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान महाशिवरात्री आयोजित यात्रा महोत्सवात पाच राज्यस्तरीय व एक अखिल भारतीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आले. आता हाच पॅटर्न राज्य सरकारने स्वीकारला असून, ज्या ज्या ठिकाणी यात्रा भरते तेथे तेथे सरकार कृषी प्रदर्शन भरवणार आहे, अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी दिली.
सिद्धेश्वर देवस्थानतर्फे २००५मध्ये पहिले राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरविण्यात आले. त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या सूचनेनुसार २००६मध्ये अखिल भारतीय कृषी प्रदर्शन भरविले गेले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे यासाठी सहकार्य लाभले. या राष्ट्रीय कृषी प्रदर्शनानंतर सलग ४ वर्षे यात्रा महोत्सवात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शने भरवण्यात आली. या सर्व प्रदर्शनांना शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यात्रा महोत्सवात कृषी-पशुप्रदर्शन, महिला बचतगटाने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, सिंधूताई सपकाळ यांचे महिलांसाठी व्याख्यान आदी उपक्रम राबवले जातात. शेतकरी यात्रेच्या काळात देवदर्शनासाठी मोठय़ा संख्येने एकत्र येतात. अशा ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रबोधन व्हावे, म्हणून कृषी प्रदर्शन भरवावे म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व सरकारकडे पाठपुरावा केला होता. आता राज्य सरकारने लातूरच्या सिद्धेश्वर यात्रा कृषी प्रदर्शनाचा पॅटर्न राज्यभर राबवण्याचे ठरविले आहे. देवस्थानचे अध्यक्ष विक्रम गोजमगुंडे यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.