पोलिसांप्रति समाजात असलेली भीती दूर करण्यासाठी विविध संस्थांना भेटी देऊन त्यांच्याशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करून त्यांना समजून घेत कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन महाराष्ट्र पोलीस अकादमीचे सहसंचालक सुनील फुलारी यांनी केले.
उंटवाडी रोडवरील निरीक्षणगृह व बालगृहातील मुला-मुलींनी नुकतीच पोलीस अकादमीस भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी सहसंचालक राजेंद्र पगारे, एन. एस. इथापे, पोलीस अधीक्षक रमेश गोराडे, निरीक्षणगृहाचे मानद सचिव चंदुलाल शाह आदी उपस्थित होते. या वेळी फुलारी यांनी पोलिसांनी संवेदनशील असणे आवश्यक आहे, त्यासाठी अशा संस्थांमध्ये भेटी देऊन तसेच त्या संस्थांमधील मुलांनाही पोलीस अकादमीतील विविध बाबींची माहिती व्हावी यासाठी अशा भेटींचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या माध्यमातून पोलिसांप्रति असलेली भीती दूर होऊन आपुलकीचे नाते तयार होईल.
पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून अशा संस्थांमधील अनाथ, निराधार बालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. निरीक्षणगृहातील मुला-मुलींना पोलिसांविषयी विशेष आकर्षण होते. या भेटीच्या निमित्ताने ही संधी उपलब्ध झाल्याचे शहा यांनी सांगितले. बालकांना शताब्दी संग्रहालयातील पोलीस मेडल, प्रशिक्षणात वापरली जाणारी साधने, पोलिसांच्या रँक यांची माहिती दिली. त्यानंतर क्राइम सेन्स प्रयोगशाळेतील घरफोडी, अपघात, जळीत घटना, गळफास, बलात्कार खून आदी विविध प्रकारच्या घटनांच्या तपासाची माहिती देण्यात आली.