दक्षिणोत्तर पसरलेल्या मुंबईची वाहतूक व्यवस्थासुद्धा तशीच आहे. पण मुंबई आता पूर्व-पश्चिमसुद्धा अवाढव्य वाढली आहे. या दोन दिशा जोडल्यास मुंबईच्या अध्र्या वाहतूक समस्या सुटू शकतात. होऊ घातलेली मेट्रो त्याचेच उदाहरण आहे. याच मेट्रो मार्गाला समांतर जाणारा सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोडही आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे देशातील पहिल डबल डेकर उड्डाणपुलही याच मार्गावर असून लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे.
या मार्गामुळे ठाणे, नवी मुंबईकर पश्चिम उपनगरांमध्ये, विमानतळ, वांद्रे टर्मिनस तर पश्चिम उपनगरांतून लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर आदी ठिकाणी आता फारशी यातायात न करता आणि वाहतूक कोंडीत न अडकता जाता येणार आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडणाऱ्या आणि मुंबईतील वाहतूक कोंडी बहुतांश प्रमाणात कमी करणाऱ्या महत्त्वाकांक्षी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याच जोडरस्त्यावर देशातील पहिला डबलडेकर उड्डाणपूल आहे. हा लिंक रोड पूर्ण झाल्यानंतर पूर्व-पश्चिम द्रुतगती महामार्गामधील अंतर अवघ्या १५ मिनिटांवर येणार आहे.
हा लिंक रोड मध्य तसेच हार्बर मार्ग ओलांडून जाणार असल्याने तो पूर्ण होण्यास वेळ लागणार होता. ३.५ किलोमीटर लांबीच्या या लिंक रोडवरच देशातील पहिला डबलडेकर उड्डाणपुल बांधण्यात आला आहे. या उड्डाणपुलाची वरील मार्गिका अमर महल जंक्शनकडे जाईल. तर खालची मार्गिका कुर्ला स्थानक आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जोडण्यात आली आहे. सांताक्रुझच्या दिशेने आल्यानंतर उड्डाणपुलाच्या खालच्या मार्गिकेवरून प्रवास केल्यानंतर डाव्या बाजूला निघणारी मार्गिका थेट लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या इमारतीकडे जाईल. तर उजवी मार्गिका नेहरू नगर भागातून कुर्ला स्थानकाला जोडणाऱ्या रस्त्याला जाऊन मिळेल.
अमर महल जंक्शन, वाकोला, शीव, कुर्ला या परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्गाना एकमेकांशी जोडण्यासाठी सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचे काम हाती घेण्यात आले होते. याआधी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून पूर्व द्रुतगती महामार्गावर येण्यासाठी गर्दीच्या वेळी दीड तासापेक्षा जास्त वेळ लागत होता. मात्र आता हा लिंक रोड खुला झाल्यानंतर हे अंतर केवळ १५ मिनिटांत कापता येणार आहे. या लिंक रोडचा उपयोग दर दिवशी ८० हजारांहून जास्त वाहने करतील, असे सांगण्यात येत आहे.