अमरावती जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत ७३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी अप्पर वर्धा धरणाजवळ दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला, तर बुधवारी पूर्णा आणि शहानूर नदीत दोघे वाहून गेले. परतवाडय़ानजीक कविठा गावात घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ात दोन दिवसांमध्ये पावसाने पाच जणांचे बळी घेतले आहेत.
धारणी तालुक्यात सर्वाधिक १६५.६ मि.मी. पावसाची नोंद झाली. मेळघाटातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अप्पर वर्धा धरणाची सर्व १३ दारे उघडण्यात आली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. गुरुवारी सायंकाळी अप्पर वर्धा धरणाजवळ पोहण्यासाठी उतरलेल्या दोन युवकांना जलसमाधी मिळाली. त्यांचे मृतदेह अजूनही हाती लागलेले नाहीत. त्यांची नावेही कळू शकली नाहीत. बुधवारी गजानन गोखे (३६) याचा शहानूर नदीत बुडून मृत्यू झाला, तर थुगाव येथील अजय दीपक बोरवार हा १९ वर्षीय युवक पूर्णा नदीत वाहून गेला. परतवाडय़ानजीक कविठा येथे घराची भिंत कोसळल्याने विश्वनाथ मोतीराम देऊळकर (६५) यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांत मृतांची संख्या पाचवर पोहोचली आहे. गुरुवारी रात्री संपूर्ण जिल्ह्य़ातील जोरदार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, मेळघाटातील सिपना आणि इतर नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. अनेक गावांमध्ये वाहतूक कोलमडून गेली आहे. धारणी ते बऱ्हाणपूर, अकोट, रंगूबेली, चाकर्दा या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. सेमाडोह आणि मांगियाजवळ पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे.
हिराबंबई ते शिवाझरीदरम्यान एमएच ४०/७३७८ क्रमांकाची बस रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. ही बस दादरा येथून धारणीकडे येत होती. अप्पर वर्धा धरणात ९२.५१ टक्के जलसाठा झाला असून पावसाळ्यात प्रथमच या धरणाचे सर्व १३ दरवाजे उघडण्यात आले. सध्या धरणातून २०५२ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. जिल्ह्य़ातील चारही मध्यम प्रकल्प तुडुंब भरले असून, शहानूर आणि सापन प्रकल्पाचे प्रत्येकी चार, तर पूर्णा प्रकल्पाचे पाच आणि चंद्रभागा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले आहेत. पूर्णा प्रकल्पातून २१५ क्युसेक्स पाणी सोडले जात असल्याने पूर्णा नदीला प्रचंड पूर आला आहे. शहानूर धरणातून ३१.७६, चंद्रभागा प्रकल्पातून २३.४९ आणि सापन प्रकल्पातून ५७ क्युसेक्स पाणी सोडले जात आहे. जिल्ह्य़ातील ४८ पैकी २७ लघु प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. अप्पर धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढल्याने वर्धा नदी ओसंडून वाहू लागली आहे. शुक्रवारीही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींनी वातावरण चिंब ठेवले. २४ तासांतील पाऊस- धारणी १६६ मि.मी., अमरावती ९०, भातकुली ५८, नांदगाव खंडेश्वर ७१, चांदूर रेल्वे ६८, तिवसा ५०, मोर्शी ७७, वरूड ६०, दर्यापूर ६२, अंजनगाव सुर्जी ७३, अचलपूर ७४, चांदूर बाजार ६२ आणि धामणगाव रेल्वे ४५ मि.मी.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2013 रोजी प्रकाशित
अमरावती जिल्ह्य़ात पावसाचे पाच बळी
अमरावती जिल्ह्य़ात सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम असून गेल्या २४ तासांत ७३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी अप्पर वर्धा धरणाजवळ दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला, तर बुधवारी पूर्णा आणि शहानूर नदीत दोघे वाहून गेले.
First published on: 02-08-2013 at 08:54 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five dead in heavy rain amravati