जातीयवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्व मतभेद विसरून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म पाळण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या नवी मुंबईतील नेत्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. संजीव नाईक यांची उमेदवारी बदलण्यात यावी आणि काँग्रेस नगरसेवकांच्या प्रभागात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लुडबुड करणार नाही अशा दोन मागण्या या वेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी मांडल्या. डॉ. नाईक यांना सहकार्य करणार नाही अशी भूमिका नवी मुंबईतील स्थानिक काँग्रेस नेतृत्वाने घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री चव्हाण यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मुंबईत बोलविले होते. त्या वेळी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा सल्ला देताना आघाडी धर्म पाळा असे मुख्यमंत्र्यांनी सुचविले.
काहीही गडबड चालणार नाही असेही ते म्हणाले. या वेळी काँग्रेसचे नामदेव भगत, संतोष शेट्टी, रमाकांत म्हात्रे, अनिल कौशिक, दशरथ भगत, निशांत भगत या पदाधिकाऱ्यांचा रंगढंग बघून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी खासगीत चर्चा केल्याचे समजते. नाईक कुटुंबीयांची घराणेशाही मोडण्यासाठी येथील उमेदवार बदलण्याची मागणी या वेळी करण्यात आली. तो निर्णय राष्ट्रवादीचा असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत मत व्यक्त केले नाही. राष्ट्रवादीचा कोणताही उमेदवार असला तरी आमच्या नगरसेवकांच्या प्रभागात प्रचार आम्हीच करणार अशी एक दुसरी भूमिका मुख्यमंत्र्यासमोर ठेवण्यात आली, पण आघाडी धर्म पाळा इतके सांगून मुख्यमंत्र्यांनी या पदाधिकाऱ्यांना वाटेला लावले.
या बैठकीला काँग्रेसच्या नगरसेवकांना नेण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. राष्ट्रवादीच्या मित्रपक्षाची एकीकडे अशी तळ्यात मळ्यात भूमिका असताना महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी पत्रकार परिषदेत नाईक कुटुबीयांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. नाईक हे राष्ट्रवादीचे नेते नसून ती एक खासगी कंपनी आहे. त्यांनी नाईक यांची संभवना मिस्टर पाच टक्केअशी केली.