कधीकाळी अन्नधान्यात परावलंबी असणाऱ्या भारताने आज मात्र यामध्ये अफाट प्रगती केली आहे. जगातल्या १५-१६ देशांना आपण अन्नधान्य पुरवू शकतो. गोदामात धान्य ठेवायला जागा शिल्लक नाही, अशी स्थिती आहे. प्रश्न आहे तो पाण्याचा. हे पाणी आपण कुठून व कसे आणणार? भविष्यात गाव व शिवारात पडणारा पाण्याचा थेंबन् थेंब वाचवला पाहिजे, असे आवाहन करीत दुष्काळाच्या संकटावर पक्षीय मतभेद विसरून सर्वजण एक होऊ, अशी साद केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी घातली. दरम्यान, विद्यापीठांमधून शिकणाऱ्या दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवडय़ात औरंगाबाद येथून करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांच्या संकल्पनेतील शिक्षण, आरोग्य, पोषण जनसंवाद अभियानाच्या प्रबोधन शिबिराचा समारोप पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. येथील नूतन विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणावर आयोजित कार्यक्रमास पालकमंत्री प्रकाश सोळंके, फौजिया खान, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार सीताराम घनदाट, बाबाजानी दुर्राणी, सतीश चव्हाण व विक्रम काळे, माजी खासदार सुरेश जाधव, विलास गुंडेवार, महापौर प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विजय भांबळे, स्वराज परिहार, जि. प.च्या अध्यक्षा मीना बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी डॉ. शालिग्राम वानखेडे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री आदी उपस्थित होते.
पवार यांनी दुष्काळाची तीव्रता भयावह असल्याचे सांगत भावनिक साद घातली. अंबड तालुक्यातील रुई गावी रोजगार हमी योजनेच्या कामाला भेट दिली. तेथे २५ एकर व ४ एकर मोसंबी, तसेच ३ एकर ऊस असलेला शेतकरी आपल्याला रोहयोच्या कामावर भेटला, याची आठवण पवार यांनी सांगितली. दुष्काळावर पक्षीय मतभेद विसरून सर्वानी एकत्र आले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने यासाठी सहकार्याची भूमिका घेतली आहे. खरिपासाठी केंद्राने ७७८ कोटींचे सहकार्य केले. रब्बीसाठीही संकटग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली जाईल. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सत्तेचा वापर करण्यात आम्ही कमी पडणार नाही, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री सोळंके यांनी जिल्ह्य़ात शेतकऱ्यांना पतपुरवठा करण्यासाठी आणखी राष्ट्रीयीकृत बँकांची आवश्यकता असल्याची मागणी केली, तर मंत्री खान यांनी परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता प्रतिपादन केली. वरपुडकर यांनी सद्यस्थितीत दुष्काळाचे निकष बदलण्याची मागणी केली. मित्रगोत्री, वानखेडे, आमदार दुर्राणी यांची भाषणे झाली. समशेर वरपुडकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सचिन जोशी यांनी केले. दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी निधी म्हणून त्रिधारा शुगरच्या वतीने तहसीन अहमद खान यांनी एक लाख, तर रावसाहेब जामकर विद्यालयाच्या वतीने ५० हजार रुपये निधी देण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Feb 2013 रोजी प्रकाशित
पक्षीय मतभेद विसरून दुष्काळाचा मुकाबला हवा
कधीकाळी अन्नधान्यात परावलंबी असणाऱ्या भारताने आज मात्र यामध्ये अफाट प्रगती केली आहे. जगातल्या १५-१६ देशांना आपण अन्नधान्य पुरवू शकतो. गोदामात धान्य ठेवायला जागा शिल्लक नाही, अशी स्थिती आहे. प्रश्न आहे तो पाण्याचा.
First published on: 22-02-2013 at 03:14 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Forget political debate and need confrontation of drought