‘म्हाडा’मध्ये घर मिळवून देतो असे सांगून एका त्रिकुटाने डोंबिवली, मालाड, विरार भागांतील दीडशे नागरिकांना सुमारे दीड कोटी रुपयांचा गंडा घातला असल्याची माहिती चौकशीतून पुढे येत आहे. या नागरिकांनी कुरारगाव पोलीस ठाणे व आर्थिक गुन्हे विभागात तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी माहिती विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुलकर्णी यांनी दिली. या प्रकरणात आनंद मालाडकर आणि आनंद कांबळे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या चौकशीतून सुनीता साळवी या महिलेलाही अटक करण्यात आली आहे. म्हाडामध्ये अधिकारीपदावर नोकरीला आहोत, असे सांगून सुनीता नागरिकांची फसवणूक करायची. या त्रिकुटाने पश्चिम उपनगरातील सुमारे १५० नागरिकांना सुमारे दीड कोटी रुपयांना म्हाडाचे घर देतो सांगून फसविले असल्याचे प्राथमिक माहितीत पुढे आले आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. बहुतांशी फसवणूकदार हे पश्चिम उपनगरांतील असल्याने त्यांना त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि मुंबईत आर्थिक गुन्हे विभागाकडे तक्रारी दाखल करण्याचे सूचित करण्यात आले आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यांच्याकडून भ्रष्टाचार निर्मूलन समिती, राष्ट्रीय पक्षाची सदस्य असल्याची ओळखपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
डोंबिवलीतील विलास म्हात्रे या तरुणाची घाटकोपरमध्ये म्हाडाचे घर देतो सांगून या त्रिकुटाने फसवणूक केली होती. काहींना म्हाडाची बनावट हस्तांतर पत्रे दिली आहेत. या तक्रारीवरून हा घोटाळा पुढे आला आहे, असे पोलिसांनी सांगितले. काही फसवणूकदारांना नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.