विकासकाने महापालिकेच्या नेमक्या कोणत्या अटींची पूर्तता केली आहे हे माहीत नसताना घरे ताब्यात घेतल्यास भविष्यात आपली काय गत होईल, ही भीती गिरगावमधील १९ कुटुंबांना भेडसावते आहे. एकवीरा सदन या इमारतीमधील रहिवाशांचा विरोध असतानाही विकासक शेजारच्या शिवपार्वती इमारतीबरोबर एकत्रीकरणाचा घाट घालत आहे. तसेच आराखडय़ात नसतानाही त्याने जादा बांधकाम केले असल्याने एकवीरामधील मूळ रहिवाशांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे. त्यातही बहुतांश रहिवासी ज्येष्ठ नागरिक असल्याने आयुष्याच्या सायंकाळी तरी आपले स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही, ही चिंता त्यांना भेडसावते आहे.
गिरगावच्या मुगभाट क्रॉसलेनमधील एकवीरा सदनातील १९ रहिवाशांनी २००९ मध्ये विकासक के. र्मचट यांना संमतीपत्रे दिली. दोन वर्षांमध्ये इमारत बांधण्याचे आश्वासन विकासकाने दिले होते. पालिकेकडून २०१० मध्ये ‘आयओडी’ मिळल्यानंतर त्याने एकवीरा सदन जमीनदोस्त केली. त्यानंतर लगेच त्याने शेजारचीच शिव-पार्वती इमारतही ताब्यात घेतली. अवघ्या २७३ चौरस मीटर भूखंडावर उभ्या असलेल्या शिव-पार्वतीचा ७० टक्के भाग रस्ता रुंदीकरणात जात आहे. शिव-पार्वतीमधील रहिवाशांना आपल्या इमारतीत सामावून घेण्यास एकवीराचे रहिवासी तयार नव्हते. मात्र विकासकाने एकवीरा आणि शिव-पार्वतीच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव तयार करून पालिकेला सादर केला. त्यास पालिकेने अद्याप मंजुरी दिलेली नाही.
या पाश्र्वभूमीवर आजघडीला एकवीरा सदनच्या जागी १९ मजली इमारत उभी राहिली आहे. एकत्रीकरणास मंजुरी मिळताच त्यावर आणखी चार मजले चढविण्याचा विकासकाचा मानस आहे. विशेष म्हणजे हे मजले उभारण्यापूर्वीच त्यातील सदनिकांची विक्रीही विकासकाने केली आहे. एकवीरामधील रहिवाशांची परवानगी न घेताच विकासकाने पालिकेला प्रस्ताव सादर केला आहे. रहिवाशांना दाखविलेल्या आराखडय़ाव्यतिरिक्त बांधकाम या इमारतीत केले आहे, असा आरोप या इमारतीमधील रहिवासी नीलेश समेळ यांनी केला आहे.
एकवीराच्या आराखडय़ात पहिल्या चार मजल्यांवर वाहनतळ दाखविण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र पाचव्या मजल्यावरही वाहनतळ आहे. इमारत बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने मंजुरी देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना हा प्रकार दिसला नाही का, असा सवाल समेळ यांनी केला आहे. दरम्यान, एकत्रीकरणाचा प्रस्ताव रखडल्याने शिव-पार्वतीमधील रहिवाशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नसतानाही शिव-पार्वतीच्या चटईक्षेत्राचा वापर करून विकासकाने नव्या इमारतीत पहिल्या पाच मजल्यांच्या पाठीमागच्या मोकळ्या जागेत सदनिका बांधल्या आहेत. त्याकडेही पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही. नव्या इमारतीमध्ये दोन लिफ्ट आवश्यक आहेत, परंतु केवळ एकच लिफ्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच वेळी एकत्रीकरणाचा फेरविचार करण्याची रहिवाशांची मागणी फेटाळून लावत म्हाडाने नव्या इमारतीला अंशत: भोगवटा प्रमाणपत्र देण्याची शिफारस पालिकेला केली आहे. हे प्रमाणपत्र मिळवून एकवीरामधील रहिवाशांना नव्या इमारतीमधील घरांचा ताबा देण्याची धवपळ विकासकाने सुरू केली आहे.
विकासकाने कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्यास कॅम्पा कोलाप्रमाणे आमच्यावरही भविष्यात गदा येऊ शकते, अशी भीती समेळ यांनी व्यक्त केली आहे.
शंभर टक्के कायदेशीर इमारत बांधणार
एकवीरा आणि शिव-पार्वती इमारतींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव पालिकेत सादर केला असून त्याला परवानगी मिळताच त्यावर आणखी चार मजले चढविण्यात येतील. कायदेशीर बाबी पूर्ण करूनच ही इमारत पूर्ण केली जाईल, असे विकासक कपिल र्मचट यांनी सांगितले. आता पाचव्या मजल्यावर वाहनतळासाठी जागा सोडण्यात आली आहे. मात्र पालिकेची परवानगी मिळाली नाही तर तेथे सदनिका बांधण्यात येतील, असे ते म्हणाले. पालिकेने परवानगी नाकारल्यास शिव-पार्वती ‘जैसे थे’ ठेवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र एकवीरामधील रहिवाशांच्या विरोधाबाबत विचारले असता र्मचट यांनी काहीही उत्तर दिले नाही.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
गिरगावातील एकवीरा सदनच्या रहिवाशांना लागला घोर
विकासकाने महापालिकेच्या नेमक्या कोणत्या अटींची पूर्तता केली आहे हे माहीत नसताना घरे ताब्यात घेतल्यास भविष्यात आपली काय गत होईल
First published on: 12-11-2013 at 06:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girgaon ekveera sadan residentals in trouble