उरण तालुक्यातील गरीब व गरजूंना खासगी रुग्णालयात उपचार घेणे परवडत नसल्याने उरणच्या एकमेव इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाची वाट धरावी लागते. या रुग्णालयात शासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक असुविधांना रुग्णांना सामोरे जावे लागत असतानाच रुग्णालयात सोनोग्राफी व एक्स-रेची सोय नसल्याने उरणमधील रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर उरणपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांचे हाल होत असून, रुग्णालयात सोनोग्राफी व एक्स-रे मशीनची सोय करण्याची मागणी येथील समाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
उरणमधील वाढते नागरीकरण व त्यामुळे वाढणारी रुग्णांची संख्या यामुळे उरणमधील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय उपचारासाठी कमी पडू लागलेले आहे. उरणमधील लोकप्रतिनिधीच्या मागणीनुसार शासनाने उरणसाठी सुपर स्पेशालिटी रुग्णालय देण्याचे मान्यही केलेले आहे. मात्र या रुग्णालयाच्या उभारणीसाठी वेळ लागणार असल्याने सध्या अस्तित्वात असलेल्या शासकीय रुग्णालयामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्णालयात एक्स-रे मशीन आहे, मात्र ती मागील २० वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याने मशीन चालविण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑपरेटरला अलिबाग येथे पाठविण्यात आलेले होते. सोनोग्राफीसाठी माणूस नसल्याने या रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन चंद्रपूर येथील रुग्णालयासाठी नेण्यात आलेली आहे. यामुळे सोनोग्राफी आणि एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांना खासगी रुग्णालयाच्या पायऱ्या चढाव्या लागत असल्याने खासगी रुग्णालय याचा फायदा उचलून  उखळ पांढरे करून घेत आहेत.