नागपूर विभागात २२ हजारांवर घरांचे नुकसान
अमरावती विभागात ६० हजार हेक्टर पिकांची हानी
नागपूर विभागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असून मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. विदर्भात अतिवृष्टीने ७० लोकांचे बळी घेतले आहेत. नागपूर विभागात ३७ तर अमरावती विभागात ३३ बळी गेले आहेत. नागपूर विभागात २२ हजारांवर घरांचे नुकसान झाले आहे. ५० वर गुरे मृत्युमुखी पडली असून अडीच लाख हेक्टरमधील पिकांची हानी झाली आहे. अमरावती विभागात ६० हजार हेक्टर पिकांची हानी झाली आहे.
विदर्भात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या सर्वेक्षणाचे काम अद्यापही सुरूच आहे. अतिवृष्टीने नागपूर जिल्ह्य़ात ८, वर्धा १३, चंद्रपूर १२, भंडारा १, गडचिरोली १ आणि गोंदिया जिल्ह्य़ात २ बळी घेतले आहेत. पावसामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत दिली जात असून आतापर्यंत ४० लाख, ४४ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. विभागात ११ हजार, ६३९ घरांचे अंशत: तर १० हजार ६८९ घरांचे पूर्णत: नुकसान झाले आहे. नागपूर जिल्ह्य़ात ९,४०६, वर्धा ४,७२६, भंडारा ३८०, गोंदिया १, २१२, चंद्रपूर ४, ६८४ आणि गडचिरोली जिल्ह्य़ात ९२० घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे क्षतिग्रस्त झालेल्या कुटुंबीयांना १६ लाख रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले. विभागात ५० वर गुरांचा मृत्यू झाला असून गुरांच्या मालकांना साडेतीन लाखांची मदत देण्यात आली.
अतिवृष्टीमुळे विभागात जवळपास अडीच लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन व धान पिकांची मोठी हानी झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा व गोंदिया या जिल्ह्य़ांतील नुकसानाबाबतच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून गडचिरोली जिल्ह्य़ातील सर्वेक्षणाची आकडेवारी अद्याप प्राप्त झालेली नाही. नागपूर जिल्ह्य़ातील १६९ हेक्टर पीक क्षेत्राखालील जमीन खरडून गेली आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधारेमुळे विभागातील प्रकल्पांतील जलसाठा झपाटय़ाने वाढला आहे. विभागातील मोठय़ा १९ प्रकल्पांपैकी १०, मध्यम ४० पैकी २३ प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. विभागात शंभरावर लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. नाले व नद्यांना आलेल्या पुराचा अनेक गावांना तडाखा बसला. रस्ते आणि रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली.
पश्चिम विदर्भात
६० हजार हेक्टरात पीकहानी
पश्चिम विदर्भात गेल्या काही दिवसांमध्ये अतिपावसाने हजारो हेक्टरमधील पिके धोक्यात आणली असून काही भागात तर शेतजमीनच खरडून गेली आहे. आतापर्यंत पावसाने अमरावती विभागात ३३ जणांचे बळी घेतले आहेत. ६० हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. विभागात सरासरीच्या १७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. काही तालुक्यांनी तर वार्षिक सरासरीही ओलांडली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती विभागात पूर, घरांची पडझड आणि वीज पडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ३३ वर पोहोचली आहे. सर्वाधिक १४ मृत्यू यवतमाळ जिल्ह्य़ात झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार विभागात ६० हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे सर्वेक्षणाच्या कामातही अडथळे येत आहेत. येत्या काही दिवसात नुकसानीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊ शकेल, तेव्हाच हानीची नेमकी माहिती समोर येईल, असे सूत्रांनी सांगितले.
यवतमाळ जिल्ह्य़ात सर्वाधिक ३६ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्य़ात ७ हजार, वाशीम जिल्ह्य़ात १० हजार, अकोला जिल्ह्य़ात ३ हजार आणि बुलढाणा जिल्ह्य़ात २ हजार हेक्टरमधील पिकांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार तालुक्यात २३ जुलैला सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आणि पंधरा तासात तब्बल १७ इंच पाऊस झाला. या पावसाने १० गावांना फटका दिला असून ७०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान, तर ५०० हेक्टरमधील जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ात ११३ गावांमधील १ हजार ९८६ कुटुंबांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. घरांची मोठय़ा प्रमाणावर पडझड झाली आहे. अमरावती विभागातील सात तालुक्यांमध्ये तर पावसाने वार्षिक सरासरीही ओलांडली आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्य़ातील लोणार, वाशीम जिल्ह्य़ातील रिसोड आणि यवतमाळ जिल्ह्य़ातील आर्णी, उमरखेड, मोहगाव, वणी आणि केळापूर या तालुक्यांचा समावेश आहे. लोणार तालुक्यात वार्षिक सरासरी पाऊस ७२२ मि.मी. आहे, पण आतापर्यंत ७९० मि.मी. पाऊस बरसून गेला आहे. एकाच दिवशी ४१९ मि.मी. पाऊस झाल्याने ही सरासरी गाठली गेली आहे. आर्णी तालुक्यातही सरासरी ८१६ मि.मी. हून अधिक म्हणजे १२०२ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पावसाने यंदा अनेक उच्चांक मोडले असून बुलढाणा जिल्ह्य़ात आतापर्यंतच्या सरासरीच्या १७८.८ टक्के, अकोला १६० टक्के, वाशीम २०० टक्के, अमरावती १५५ टक्के, तर यवतमाळ जिल्ह्य़ात १८० टक्के पाऊस झाला आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे मुबलक जलसाठा झाला आहे. पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला असला, तरी धरणांमधून सोडण्यात येणाऱ्या जादा पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. सध्या विभागातील सर्वात मोठय़ा अप्पर वर्धा, अरुणावती धरणाचे ७ दरवाजे, काटेपूर्णा आणि वान प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले आहे. अप्पर वर्धातून ४१५ क्यूसेक, पूसमधून १४२, अरुणावतीमधून २०३, काटेपूर्णा मधून ९२.२३, तर वसन प्रकल्पातून २७.४ क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. जुलै महिन्यातच विभागातील २३ मध्यम प्रकल्पांपैकी १२ प्रकल्पांमधून पाणी सोडण्याची वेळ आली आहे. ३४४ पैकी १८३ लघू प्रकल्प १०० टक्के भरले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2013 रोजी प्रकाशित
विदर्भात अतिवृष्टीचे ७० बळी
नागपूर विभागात आठवडाभरापासून सुरू असलेल्या पावसाचा जोर अजूनही कायम असून मोठय़ा प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. विदर्भात अतिवृष्टीने ७० लोकांचे बळी घेतले आहेत. नागपूर विभागात ३७ तर अमरावती विभागात ३३ बळी
First published on: 26-07-2013 at 08:34 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain conflict 70 dead in vidharbha