महापालिका निवडणुकीच्या निकालापासून शहरात सुरू झालेले मारहाण, दगडफेक यांचे सत्र अजूनही थांबण्याचे नाव घेत नसून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन नगरसेवकांशी संबंधित गटांमध्ये सुरू झालेल्या आव्हान-प्रतिआव्हानांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजवर्धन कदमबांडे यांनी शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यात येईल अशी ग्वाही अलीकडेच झालेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. परंतु त्यांचा आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर कोणताही वचक नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.
शहरातील जुने धुळे परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका ललिता आघाव यांच्या घरावर जमावाने रविवारी मध्यरात्री दगडफेक केली. दरवाजा तोडून घरात धुडघूस घालत दहशत माजवली. या प्रकरणी राष्ट्रवादीचेच नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचा मुलगा देवा उर्फ देवेंद्र सोनार याच्यासह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ डिसेंबर रोजी महापालिकेची मतमोजणी झाली. त्याच दिवशी रात्री आघाव कुटुंबियांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घटनेची चर्चा संपूर्ण शहरात होत असतानाच रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास नगरसेविका ललिता आघाव व अशोक आघाव यांच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र सोनार, टिल्या बडगुजर, मुल्या बडगुजर, भूषण यांसह इतर चार ते पाच जणांचा जमाव कोयता, काठय़ा, सळई यांसह चाल करून आला. शिवीगाळ, दमदाटी केल्यानंतर त्यांनी घरात प्रवेश करून आघाव यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची मोडतोड केली. या प्रकरणातही देवा सोनारसह जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी पक्षांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमधील या हाणामारीच्या घटनेचा निषेध केला असून १६ डिसेंबरच्या घटनेनंतर लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आ. अनिल गोटे यांनी असे काही होईल हे आपण आधीच वर्तविले होते. आपले म्हणणे इतक्या लवकर खरे होईल असे वाटले नव्हते, असा टोला राष्ट्रवादीला लगावला होता. तसेच धुळेकरांनी मतदानाव्दारे कौल दिला असल्याने पुढे जे होईल ते भोगण्यास त्यांनी तयार राहावे, अशी वेदनाही व्यक्त केली होती. शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीही राष्ट्रवादीतील गुंडगिरीमुळे शहरातील शांतता धोक्यात येईल अशी भीती व्यक्त केली होती.
आपल्याच पक्षातील नगरसेवकाच्या गुंड मुलाची दादागिरी त्यांच्याच पक्षातील महिला नगरसेविकेच्या कुटूंबियांना सहन करावी लागत असतानाही पक्षाचे पदाधिकारी मात्र या गुंडाविरूध्द कोणतीही कठोर कारवाई करण्यास कचरत आहेत. ज्येष्ठ पदाधिकारी या गुंडास पाठीशी घालत असल्याची प्रामाणिक कार्यकर्त्यांची भावना झाली असून अशीच स्थिती राहिल्यास पक्ष दुभंगण्याची शक्यताही काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.