गोराई-चारकोपमधील म्हाडाच्या बैठय़ा वस्त्यांमध्ये ‘नॅचरल गॅस’ पाइपलाइनने आणण्याच्या मागणीला ‘महानगर गॅस लिमिटेड’ने तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र, या बैठय़ा वस्त्यांमधील घरांच्या रचनेमुळे इथल्या कमी रुंदीच्या भिंतींमधून गॅसचे पाइप आणायचे कसे, असा प्रश्न आता महानगर गॅसला पडला आहे. त्यामुळे, इथल्या तब्बल एक हजार कुटुंबांना पाइपने गॅस पुरविणे हे महानगर गॅससमोरील मोठे आव्हान असणार आहे.
गॅस सिलिंडरवरील अनुदान कमी केल्यामुळे तुलनेत स्वस्त आणि सुरक्षित असलेल्या पाइप गॅसची जोडणी मिळविण्याकडे लोकांचा कल आहे. सिलेंडर आणण्याच्या कटकटीतून सुटका व गरजेप्रमाणे वापर त्यामुळेही नॅचरल गॅस पाइपलाइनला मोठी मागणी आहे. इमारतींना गॅसची जोडणी मिळविताना अडचण येत नाही. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव झोपडपट्टय़ा आणि बैठय़ा चाळींना पाइप गॅसची जोडणी दिली जात नाही. मात्र, ‘चारकोप-गोराईतील म्हाडाच्या वस्त्यांची तुलना झोपडपट्टय़ांशी करता येणार नाही. या बैठय़ा वस्त्यांची रचना नियोजनबद्ध असल्याने तिथे पाइप गॅसने पुरवठा करण्यात यावा,’ अशी मागणी उत्तर मुंबईचे खासदार संजय निरूपम यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांच्याकडे केली होती.
केंद्र सरकारच्या सूचनेवरून या भागात पाइप गॅसने पुरवठा करणे शक्य होईल का याची चाचपणी आता महानगर गॅसने सुरू केली आहे. त्या करिता या परिसरातील बैठय़ा चाळींच्या सर्वेक्षणाचे काम कंपनीने हाती घेतले आहे. वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये कंपनीतर्फे सव्र्हेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणाचा पहिला टप्पा नुकताच पडला. या सर्वेक्षणात ज्या दोन घरांमध्ये एकाच सामाईक भिंतीला लागून स्वयंपाकगृहे आहेत, त्या घरांना पाइप गॅसने पुरवठा करता येईल का, अशी शंका या पहिल्याच सर्वेक्षणात अधिकाऱ्यांना पडली आहे. कारण, इथल्या दोन लागून असलेल्या घरांची मधली भिंत सामाईक आहे. या शिवाय इमारतीतील भिंतीच्या तुलनेत तिची रुंदीही कमी असते. त्यामुळे, भितींची ही मर्यादित रुंदी पाइप गॅस आणण्यास अडचणीची ठरू शकते, असा प्राथमिक निष्कर्ष कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढल्याची माहिती आहे. या माहितीला या सर्वेक्षणाच्या वेळी हजर असलेले स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनीही दुजोरा दिला आहे. ज्या दोन घरांमध्ये स्वयंपाकगृहे लागून नाहीत, अशा रस्त्याला लागून असलेल्या घरांमध्ये गॅसने पाइप आणण्यास काहीच अडचण नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
सव्र्हेक्षण अद्याप बाकी
महानगर गॅसच्या प्रवक्त्या मीरा अस्थाना यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्वेक्षणाचे काम सुरू असून आत्ताच कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. सर्व सुरक्षाविषयक निकषांचा विचार करूनच चाळींना पाइपने गॅस पुरविता येईल का याचा निर्णय घेतला जाईल, अशी पुस्ती त्यांनी जोडली.
सर्वच बैठय़ा चाळींना होणार फायदा
गेली काही वर्षे महानगर गॅस पाइपलाइनचे जाळे मुंबईभरात विस्तारत आहे. बोरिवलीत एमएचबी कॉलनीपर्यंत पाइप गॅस आला आहे. त्यामुळे, गोराई-चारकोपमधील रहिवाशी आपल्याकडे पाइप गॅस कधी येणार याच्या प्रतीक्षेत आहेत. येथील इमारतींना पाइपने गॅस पुरविण्यास काहीच अडचण नाही. पण, बैठय़ा चाळींना पाइपने गॅस पुरवठा होईल की नाही, हे महानगर गॅसच्या पाहणीनंतरच स्पष्ट होईल. गोराईला गॅस पाइपने पुरवठा करणे शक्य झाल्यास त्याचा फायदा चारकोप, अंधेरीसारख्या मुंबईतील इतरही बैठय़ा चाळींना होणार आहे. त्यामुळे, येथील महानगर गॅसच्या सव्र्हेक्षणावर सध्या रहिवाशांची नजर लागून राहिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
अरुंद भिंतींमधून पाइप गॅस आणायचा कसा?
गोराई-चारकोपमधील म्हाडाच्या बैठय़ा वस्त्यांमध्ये ‘नॅचरल गॅस’ पाइपलाइनने आणण्याच्या मागणीला ‘महानगर गॅस लिमिटेड’ने तत्त्वत: मान्यता दिली आहे

First published on: 18-01-2014 at 01:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to bring gas from tiny walls