रुग्णालये व नर्सिग होमच्या अग्निप्रतिबंधक सुरक्षेसाठी कडक नियमावली असली तरी जागेच्या कमतरतेमुळे महापालिका, सरकार व नर्सिग होमचे चालक या सर्वानीच याबाबत अळीमिळी गुपचिळी ठेवली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकात्यातील रुग्णालयातील आगीत ९० जणांचा मृत्यू झाल्यावर शहरातील नर्सिग होम व रुग्णालयाच्या अग्निसुरक्षा नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय फार्सच ठरला आहे.
कोलकाता घटनेनंतर मुंबईतील मोठी रुग्णालये व नर्सिंग होममधील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. शहरातील सुमारे दीड हजार नर्सिग होममध्येही अग्निसुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात नसल्याचे समोर आल्यावर आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी नर्सिग होमसाठीही अग्निसुरक्षेबाबतचे प्रमाणपत्र जोडण्याच्या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिले. दोन मीटरहून अधिक रुंदीच्या पायऱ्या, किमान दोन प्रवेशद्वारे तसेच क्षेत्रफळ व खाटांच्या क्षमतेनुसार पाण्याच्या स्वतंत्र टाक्या बसवून घेण्याचे नियम पूर्ण केल्याशिवाय नर्सिग होमच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले. शहरातील निवासी इमारतीत सुरू असलेल्या नर्सिग होमसाठी हे सर्व नियम पाळणे अशक्य असल्याने नर्सिंग होम चालकांचे धाबे दणाणले. त्यानंतर आरोग्यमंत्री, पालिकेचे आरोग्य अधिकारी यांच्याशी सतत बैठका करून ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल कन्सल्टंट’ या नर्सिग होमच्या संघटनेने हे नियम लवचिक करण्याची विनंती केली. शहरातील मध्यमवर्गीय मुख्यत्वे नर्सिग होमवर अवलंबून असल्याने सरकारनेही लवचिकता दाखवत कोणतेही कडक नियम न लावता खाजगी संस्थांनी दिलेल्या अग्निसुरक्षा प्रमाणपत्रावर परवाने नुतनीकरणाची पद्धत सुरू ठेवली आहे.
‘खाजगी नर्सिग होमची चाचणी अग्निशमन दलाकडून केली जात नाही. नोंदणीकृत संस्थेकडून त्यांनी अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र आणले की त्यानुसार ना हरकत प्रमाणपत्र दिले जाते. संबंधित प्रमाणपत्रात त्रुटी दाखवल्या असल्यास त्या पूर्ण करून घेतल्या जातात,’ अशी माहिती उपमुख्य अग्निशमन अधिकारी सुनिल नेसरीकर यांनी दिली.
मोठय़ा रुग्णालयातही सुरक्षा वाऱ्यावर
मुंबई अग्निशमन दलाने जानेवारी २०१२ मध्ये १०० खाटांहून अधिक क्षमता असलेल्या ६७ रुग्णालयांची पाहणी केली. या पाहणीत ४० रुग्णालये अग्निसुरक्षाविषयक  नियमांचा अवलंब करत नसल्याचे दिसून आले. कॅण्टिन तसेच प्रयोगशाळांसाठी या रुग्णालयात एलपीजी सिलेंडर वापरले जात होते. सुरक्षा नियमांनुसार मोकळी जागा असणे आवश्यक होते. मात्र व्हरांडा आणि पायऱ्यांची जागा स्ट्रेचर तसेच विविध वस्तू ठेवून अडवण्यात आली होती. अग्निरोधक यंत्रांची संख्या पुरेशी नव्हती तसेच आपत्कालीन मार्गाविषयी लिहिण्यात आले नव्हते. मोठय़ा व बहुमजली रुग्णालयांसाठी अग्निसुरक्षा अधिकारी नेमणे आवश्यक असते मात्र तो नेमला गेला नव्हता. पालिकेच्या सर्व १६ उपनगरीय रुग्णालयात तसेच जे जे, सेंट जॉर्ज, जीटी व कामा या सरकारी रुग्णालयातही अग्निसुरक्षेचे नियम बासनात गुंडाळून ठेवल्याचे समोर आले. यापैकी कोणत्याही रुग्णालयावर कारवाई करण्यात आलेली नाही.
कोलकाता रुग्णालय घटना
दक्षिण कोलकात्यातील एएमआरआय रुग्णालयात ९ डिसेंबर २०११ रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग तळघरात शॉर्ट सर्किटमुळे लागली व वातानुकूलित यंत्रणेसाठी लावण्यात आलेल्या वायरिंमधून वेगाने वरच्या सात मजल्यांपर्यंत पसरली. या आगीत रुग्ण व रुग्णालय कर्मचारी असे ९० जण मृत्यूमुखी पडले.