ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढणारे रस्त्यावरचे गुन्हे (स्ट्रीट क्राइम).. बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली राजरोसपणे सुरू असणारे ‘छमछम’.. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर संशयास्पदरीत्या सुरू असलेल्या मद्याच्या पाटर्य़ा आणि मोठय़ा गुन्ह्य़ांना अटकाव करण्यात सातत्याने येणारे अपयश यामुळे ठाणे पोलिसांच्या निष्क्रियतेचे वेगवेगळे नमुने दररोज पुढे येऊ लागले आहेत. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना, फसवणूक करणारे भामटे आणि कायदा धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत सुरू असणारे बार यामुळे ठाणे शहरातील पोलीस करतात तरी काय, असा सवाल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने उपस्थित होत असून स्थानिक पोलीस सुस्त आणि गुन्हे शाखाही केवळ देखाव्यापुरती असे चित्र यानिमित्ताने पुढे येत आहे.
ठाणे तसेच आसपासच्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सोनसाखळी चोरांच्या वेगवेगळ्या टोळ्या मोठय़ा प्रमाणात सक्रिय झाल्या असून या चोरटय़ांच्या उपद्रवामुळे महिला वर्गात काहीसे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोनसाखळी चोरांच्या काही टोळ्यांना पकडण्यात गुन्हे शाखेला यश आले असले तरी हे चोरटे कारागृहातून बाहेर येताच पुन्हा उपद्रव सुरू करीत असल्याचा पोलिसांचे म्हणणे आहे. जबरी चोरी, मोक्काअंतर्गत कारवाई करूनही सोनसाखळी चोरटय़ांचा उपद्रव थांबत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या चोरटय़ांपुढे हतबल झालेल्या पोलिसांनी आता जनजागृती मोहीम हाती घेतल्याचे चित्र आहे. सोनसाखळी चोरी, भामटय़ांकडून होणारी फसवणूक असे रस्त्यावरचे गुन्हे ठाणे, कल्याणात दिवसाढवळ्या घडू लागले आहेत. काही ठरावीक ठिकाणी अशा स्वरूपाचे गुन्हे वारंवार घडत असल्याचेही समोर आले आहे. असे असतानाही स्थानिक पोलिसांच्या हाती चोरटे लागत नसल्यामुळे त्यांच्या कामगिरीविषयी प्रश्नचिन्ह उभे राहू लागले आहे. गेल्या काही महिन्यांत गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने वेगवेगळ्या बारमध्ये धाडी टाकल्या असून या बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली ‘छमछम’ सुरू असल्याचे समोर आले आहे. तसेच गुरुवारी रात्री भिवंडी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका बंगल्यामध्ये छापा मारला. त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू असलेल्या एका पार्टीमध्ये विदेशी मद्य आणि महिलांचे अश्लील नृत्य सुरू असल्याचे आढळून आले होते. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही ‘अश्लील’ पार्टी रंगली होती.
ठाणे, कळवा, मुंब्रा, शीळफाटा परिसरात मोठय़ा प्रमाणावर लेडीज बार सुरू असल्याच्या तक्रारी वाढत असताना गुन्हे शाखेचे पथक एखाददुसऱ्या बारपुरती कारवाई करीत असल्याचे चित्र आहे. वर्तकनगर, शिवाईनगरचे परिसर अशा छमछमचे अड्डे तसेच लॉजिंगचे धंदे जोमाने सुरू असल्याचे बोलले जाते. त्या ठिकाणी कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे गुन्हे शाखेची कारवाई म्हणजे देखाव्यापुरतीच असल्याची चर्चा आता रंगली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2014 रोजी प्रकाशित
ठाण्यात गैरधंदे तेजीत
ठाणे शहरात दिवसेंदिवस वाढणारे रस्त्यावरचे गुन्हे (स्ट्रीट क्राइम).. बारमध्ये ऑर्केस्ट्राच्या नावाखाली राजरोसपणे सुरू असणारे ‘छमछम’.. पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर संशयास्पदरीत्या सुरू
First published on: 28-06-2014 at 02:06 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal business activity increase in thane