आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतसह मोनिका आथरे, अंजना ठमके या मुलींच्या यशामुळे नाशिक येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर सराव करणाऱ्या मुलांची कामगिरी तशी झाकोळलेली राहिलेली आहे. परंतु अलीकडील काळात आपल्या नावाची विशेष ओळख निर्माण करण्यात काही मुलेही यशस्वी झाली असून दत्ता बोरसे, सुरेश वाघ यांच्यानंतर किसन तडवी हे नाव त्यापैकी एक होय. युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बँकॉक येथे होणाऱ्या आशियाई पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघात समावेश झालेल्या किसनकडून नाशिककरांच्या अपेक्षा उंचावणे साहजिकच आहे. सर्वसाधारण कुटुंबातील या मुलांच्या कामगिरीची दखल आता सर्वानाच घेणे भाग पडू लागले आहे.
किसनने याआधीही वेगवेगळ्या स्पर्धामध्ये उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे. येथील भोसला सैनिकी विद्यालयाच्या मैदानावर प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या किसनने याआधी जळगाव येथे १४ वर्षांआतील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत ६०० मीटर अतंर एक मिनिट ३१ सेकंदात पूर्ण करून सुवर्ण मिळ्विले होते. त्याच्या अनेक सुवर्णापैकी ही एक कामगिरी होय. दिवसेंदिवस कामगिरीत सुधारणा करणाऱ्या किसनने दहावीची परीक्षा दिली असून आता भारतीय संघातून उत्कृष्ट कामगिरीची परीक्षा आता त्याला द्यावयाची आहे.
अलीकडेच राष्ट्रीय युवा अॅथलेटिक्स स्पर्धा झाली. या स्पर्धेत किसनने तीन किलोमीटर अंतर केवळ आठ मिनिट ३१ सेकंदांत पूर्ण करून आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. सुवर्ण मिळविण्यास कारणीभूत ठरलेल्या या कामगिरीमुळे त्याची भारतीय संघातही निवड झाली आहे. युवा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बँकॉक येथे २१ व २२ मे रोजी आशियाई पात्रता फेरी होणार आहे. या फेरीसाठी भारतीय संघाकडून पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदविणे आता किसनला भाग आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी या छोटय़ाशा पाडय़ाला किसनमुळे आता देश पातळीवर ओळख मिळाली आहे. खरं तर अशी छोटी छोटी गावे युवा खेळाडूंमुळे राष्ट्रीय पातळीवर चमकू लागली आहेत. कविता राऊतचे सावरपाडा..मोनिकाचे पिंपळगाव (केतकी)..अंजना ठमकेचे गणेशगाव..दत्ता बोरसेचे खडकी..कांतीलाल कुंभारचे पेठ..सुरेश वाघची वणी ही सर्व उदाहरणे त्यासाठी पुरेशी ठरावीत. यापैकी कोणत्याही खेळाडूला एकाएकी यश मिळालेले नाही. त्यासाठी कठोर परिश्रम, कधी अपयशामुळे निर्माण झालेला मानसिक गुंता, मैदानावर धावून कुठे पोट भरणार आहे काय या प्रश्नावर स्वत:च शोधलेले उत्तर म्हणजेच आज त्यांना मिळत असलेले यश होय.
आशियाई पात्रता स्पर्धेसाठी किसनसाठी दिलासादायक बाब म्हणजे त्याचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग हेही संघासोबत राहणार आहेत. दुसऱ्या देशात आपल्या प्रशिक्षकाकडून मिळणारे मार्गदर्शन किती मोलाचे असते हे अंजना ठमके, संजीवनी जाधव या सांगू शकतील. किसनमध्ये गुणवत्ता ठासून भरलेली असून आपणांस त्याच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे विजेंद्र सिंग यांचे म्हणणे आहे.