पनवेल नगरपरिषदेमधील सदस्यांचे चेहऱ्यावरील मुखवटे उतरविण्यासाठी कँाग्रेस पक्षाने उशिरा का होईना कठोर पावले टाकली आहेत. नगरपालिकेतील कँाग्रेसचे गटनेते अनिल भगत यांची पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश कँाग्रेस कमिटीच्या ग्रामीण विकासचे सरचिटणीस अभिजित पाटील यांनी दिली आहे. आमदारकी गेली, विषय समिती सभापतींचे पदही कँाग्रेस राखू शकले नाही त्यामुळे कँाग्रेसचा ठाकूर गटावर केलेला हा वार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पनवेल नगरपरिषदेमध्ये चेहरे पे चेहरा असा खेळ सुरू आहे. ३८ सदस्यांच्या नगरपरिषदेमध्ये कँाग्रेसची सत्ता कागदावर आहे. प्रत्यक्षात कँाग्रेसच्या तिकिटावर सदस्य म्हणून निवडूण आलेले सदस्य भाजपाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या गोटात सामील आहे. विधानसभा निवडणुकीत गटनेता अनिल भगत यांनी कँाग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार न करता कँाग्रेसमधून भाजपावासीय झालेल्या ठाकूर यांचा प्रचार केल्याने ही कारवाई केली असल्याचे काँग्रेस पक्षाने नमूद केले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या विषय समिती सभापतींच्या निवडी वेळी गटनेता भगत यांना पक्षाने लेखी आदेश दिले असतानाही त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी न केल्याने ही कारवाई करत असल्याचा ठपकादेखील त्यात ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे भगत यांचे गटनेता पद जाईल, परंतु त्यांचे सदस्य पद अबाधित राहले असल्याची चर्चा सध्या पनवेलमध्ये रंगली आहे. या बाबत कँाग्रेसचे गटनेते अनिल भगत यांच्याशी संपर्क साधला असता ते कुटुंबासोबत सुटीचा आनंद लुटण्यासाठी बाहेरगावी गेल्याचे त्यांनी सांगितले. कँाग्रेस पक्षाचे असे कोणतेही आदेश आपल्याला मिळाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Dec 2014 रोजी प्रकाशित
पनवेल नगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते भगत यांची पक्षातून हकालपट्टी
पनवेल नगरपरिषदेमधील सदस्यांचे चेहऱ्यावरील मुखवटे उतरविण्यासाठी कँाग्रेस पक्षाने उशिरा का होईना कठोर पावले टाकली आहेत.
First published on: 31-12-2014 at 07:38 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internal conflicts in new panvel congress