आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
रासबिहारी इंटरनॅशनल स्कुल आणि नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या वतीने आयोजित आंतरशालेय ‘रासबिहारी क्रिकेट करंडक २०१४-१५’ स्पर्धेच्या चौथ्या दिवशी रासबिहारी, सेक्रेड हार्ट, दिल्ली पब्लिक स्कुल, काकासाहेब देवधर या संघांनी विजय मिळविले.

रासबिहारी स्कुलने विस्डम हायवर नऊ गडी राखून विजय मिळविला. रासबिहारीने २० षटकात एक बाद १५३ धावांचा डोंगर रचला. विस्डम हाय संघ २० षटकात केवळ ८८ धावा करू शकला. नाबाद ६५ धावा व दोन बळी अशी कामगिरी करणारा रासबिहारीचा अनिकेत कुमार ‘सामनावीर’ ठरला.
स्वामी नारायण स्कुलविरूध्द सेक्रेड हार्टने नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळविला. स्वामी नारायणचा संघ १६ षटकात ६२ धावांमध्ये गारद झाल्यावर सेक्रेड हार्टने ८.२ षटकात एक गडी गमावून हे लक्ष्य गाठले. चार बळी घेणारा सेक्रेड हार्टचा यश राऊत सामनावीर ठरला.
दुसऱ्या एका सामन्यात दिल्ली पब्लिक स्कुलने ए. पी. पटेलविरूध्दचा सामना सहा धावांनी जिंकला. दिल्ली स्कुलने २० षटकात सात गडी गमावून ११४ धावा केल्यानंतर पटेल संघ १९.१ षटकात १०८ पर्यंत मजल मारू शकला. दिल्ली स्कुलचा अंश धूत याने ६२ धावा करताना तीन गडीही बाद केल्यानेच तोच ‘सामनावीर’ ठरला.
काकासाहेब देवधर संघाने बॉइज टाऊनवर १९ धावांनी विजय मिळविला. काकासाहेब देवधर संघाने २० षटकात दोन बाद १५५ धावा केल्या. बॉइज टाऊनचा संघ २० षटकात तीन गडी गमावून १३५ धावा करू शकला. काकासाहेब देवधर संघाचा अथर्व पवार सामनावीर ठरला. त्याने नाबाद ३७ धावा केल्या.

नेमबाजीत ‘प्रिसाइज’चे यश
नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित नाशिक विभागीय नेमबाजी स्पर्धेत प्रिसाइज शुटिंग क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ठ कामगिरी केली. १४ वर्षांआतील एयर पिस्तोल गटात संस्कृती अहिरेने तर हर्षवर्धन जाधवने मुलांमध्ये तसेच १७ वर्षांआतील एयर रायफल गटात श्वेता शिंपी यांनी अनुक्रमे ४०० पैकी ३३२, ३५२, ३२३ गुण संपादन करून सुवर्ण पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे त्यांची अमरावती येथे होणाऱ्या आंतरशालेय राज्य नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे खेळाडू अभय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रिसाईज शुटिंग क्लबमध्ये सराव करतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य स्पर्धेसाठी ‘सेक्रेड हार्ट’ रिले संघ पात्र
सांगली जिल्ह्यातील साखराळे येथे होणाऱ्या राज्यस्तर मैदानी स्पर्धेसाठी येथील सेक्रेड हार्ट स्कुलच्या चार बाय १०० मीटर रिले संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात विशाखा भाबड, मीनी कल्याणी, पूर्वा बिरारी, पूर्वा आव्हाड, अन्सरा शेख या खेळाडूंचा समावेश आहे. मिनी कल्याणी १०० मीटर धावणे आणि भाला फेक या क्रीडा प्रकारातही राज्य स्तरासाठी पात्र ठरली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नाशिक येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये आयोजित विभागीय स्पर्र्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे या खेळाडूंची राज्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना क्रीडा शिक्षक गणेश राऊत व भाग्यश्री पगारे यांचे मार्गदर्शन लाभले.