लातूर उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयास आयएसओ ९००१ २००८ गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे मानांकन मिळाले. मुंबईतील एजीएसओ प्रमाणीकरण प्रा. लि. मार्फत दोन्ही कार्यालयांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आता या कार्यालयात नागरिकांना सुसूत्रतेसह सुविधा मिळणार आहेत.
कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही व्यवस्थित नियोजन करून काम करणे सुकर होणार आहे. मानांकनामुळे आवश्यक नोंदवहय़ा ठेवून अद्ययावत करणे, विविध प्रकरणांची निर्गती, नागरिकांना द्यावयाचे दाखले विहित मुदतीत देणे, एसएमएस संदेश प्रणालीद्वारे द्यावयाची माहिती, महसुली निवाडय़ाची पारदर्शकता, कार्यालय व परिसर स्वच्छता, ई-गव्हर्नन्सचा प्रभावी वापर, अभिलेखांचे जतन व संगणकीकरण, कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक सुधारणा, नियम-अधिनियमांचे एकत्रीकरण व सुसूत्रीकरण आदी बाबींचे गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन करण्यात आले आहे. या बाबींचे लेखापरीक्षण संबंधित कंपनीचे अग्रणी लेखापरीक्षक प्रेमशंकर झा यांनी केले, तर कंपनीच्या संचालिका मोना देसाई यांनी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयास मानांकन प्रदान केले.
दरम्यान, या मानांकनासाठी औसा व रेणापूर तहसील कार्यालयेही प्रयत्नशील असून या कार्यालयांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी दिली.