जळगाव महापालिका निवडणूक
जळगाव महापालिकेत मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे लवकरच स्पष्ट केले जाईल, असे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जळगाव महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या तसेच आणि मनसेला पाठिंबा देणाऱ्या जनक्रांती अशा एकूण १४ नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. राज यांच्या विधानामुळे मनसेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे.
जळगाव महापालिकेत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नसले तरी मनसेने लक्षणीय मुसंडी मारली. मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर जळगाव महापालिकेत नेमकी कोणाची सत्ता येईल याचे समीकरण अवलंबून आहे. या पाश्र्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज यांच्या हस्ते मनसेच्या नवनिर्वाचीत सदस्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाच्या राजगड कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मनसेचे विजय कोल्हे, सिंधू कोल्हे, ललित कोल्हे, मिलिंद सपकाळे, संतोष पाटील, नितीन नन्नावरे, लीना पवार, कांचन सोनवणे, पद्माबाई भागवत-सोनवणे, मंगला चौधरी, खुशबू बनसोडे, पार्वता भील यांच्यासह जनक्रांती आघाडीचे सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जनक्रांतीच्या सुमित्रा सोनवणे अनुपस्थित होत्या.
त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी, जळगाव महापालिकेत मनसे नेमकी काय भूमिका घेणार हे ‘राज’च ठेवले. जळगाव निवडणुकीची जबाबदारी आ. प्रवीण दरेकर यांच्यावर सोपविली गेली होती. आ. दरेकर नाशिकला आले असले तरी या मुद्यावर अद्याप त्यांच्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा करून मनसे काय भूमिका घेणार हे स्पष्ट केले जाईल, असे राज यांनी सांगितले. जळगावमध्ये राज यांच्या प्रचारसभा झाल्या असत्या तर जागांमध्ये अधिक वाढ झाली असती काय, या विषयावर राज यांनी त्या ठिकाणी पक्षाची यंत्रणा सक्षम असल्याचे सांगून प्रश्नकर्त्यांची उलट तपासणी केली. राजकीय पक्षांनी कुठे किती सभा घ्यायच्या याचा निर्णय प्रसारमाध्यमे घेणार काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगावमध्ये पक्षाची यंत्रणा सक्षम आहे. एकच जाहीर सभा झाली तरी नियोजनपूर्वक प्रचार यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे पक्षाचे संख्याबळ एकवरून १२ वर पोहोचल्याचे राज यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यात नाशिक जिल्ह्यातील गंगा म्हाळगी येथील सरपंच रत्ना पालवे व उपसरपंच रोहिदास फसाणे यांचाही सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातही मनसेने आपला झेंडा रोवल्याचे यानिमित्ताने पक्षाने दाखवून दिले.