मराठवाडय़ाच्या पाण्याच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी व्हावी, अशी रचना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेनेने एवढे दिवस केली. त्यावर तोडगा काढता यावा, म्हणून काँग्रेसचे आमदार डॉ. कल्याण काळे यांनी सोमवारी उपोषण केले. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सत्ताधारी पक्षाचे आमदार डॉ. काळे यांनी लावलेला आमरण उपोषणाचा फलक पाण्यावरून राजकारण किती तापले आहे, हे व्यक्त करणारा होता. सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री स्वत: येऊन काही तरी आश्वासन देतील, असे सांगितले जात होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते तिकडे फिरकले नाहीत. त्यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा मुद्दा हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या दिवशीही पुन्हा ऐरणीवर असेल. दरम्यान, विविध पक्ष-संघटनांनीही जायकवाडी जलाशयात पाणी सोडावे, या मागणीसाठी उद्या (मंगळवारी) सकाळी १० वाजता महामोर्चाचे आयोजन केले आहे. या बरोबरच मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने नाशिकमधून तीन याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.
मराठवाडा विकास समितीची मागणी
मराठवाडय़ाला कृष्णा खोऱ्याचे २१ टीएमसी पाणी देण्यासाठी आर्थिक तरतूद करून परंडा तालुक्यातील पाणी पश्चिम महाराष्ट्राकडे वळविणे बंद करावे, अशी मागणी मराठवाडा विकास समितीने केली आहे. नगर व नाशिक जिल्ह्य़ातील सिंचन प्रकल्पामुळे जायकवाडी प्रकल्प पूर्णपणे भरत नाही. मराठवाडय़ाचे पाणी अडविले जाते. जायकवाडी प्रकल्प भरेपर्यंत वरील धरणांमध्ये पाणीसाठा होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. सेना-कोळेगाव या प्रकल्पाचे पाणी माढा तालुक्यात वळविण्यात आले आहे. मराठवाडय़ातील दुष्काळी जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. मराठवाडय़ातील अपूर्ण रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी करण्यात आली. मराठवाडा विकास समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले.
रिपाइं डेमोक्रॅटिकचा मोर्चा
मराठवाडय़ाचे हक्काचे १०२ टीएमसी पाणी जायकवाडी जलाशयात सोडावे, जायकवाडीचा जलसाठा पूर्ण होईपर्यंत वरच्या नगर व नाशिकच्या धरणांमधून कालव्यात पाणी सोडू नये, सन १९७८ पासून जायकवाडीत आलेल्या पाण्याची नोंद व आकडेवारी घोषित करावी आणि पाण्याचा हिशेब सादर करावा, जायकवाडीचे पाणी चोरणाऱ्या पाणी माफियांवर व दोषी अभियंत्यांवर कारवाई करावी, तसेच मराठवाडय़ाचे हक्काचे पाणी येत्या आठ दिवसांत सोडावे आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (डेमोक्रॅटिक) वतीने सोमवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालयावर प्रहार मोर्चा नेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड, प्रमोद रत्नपारखे, जिल्हाध्यक्ष के. व्ही. गायकवाड, नगरसेवक कैलास गायकवाड, युवा जिल्हाध्यक्ष सचिन गंगावणे, जिल्हा सरचिटणीस अशोक जगधणे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चा महामंडळ कार्यालयावर पोहोचल्यानंतर अधीक्षक अभियंता कोहीरकर यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठवडाभरात जायकवाडीमध्ये पाणी न सोडल्यास संपूर्ण मराठवाडय़ात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला.