शालेय वयातील विद्यार्थ्यांची कल्पकता आणि जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्ट या संस्थेने २१ व्या वर्षांत पदार्पण केले असून पुढील वाटचालीत दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी विशेष उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला वर्तकनगर-भीमनगर भागातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई थिराणी शाळेत दर शनिवार-रविवारी अभ्यासवर्ग घेतले जाणार आहेत. शहरातील इतर भागांतील मुलांसाठीही अशा स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाणार असून त्यासाठी संस्थेला आठवडय़ास किमान चार तास देऊ इच्छिणाऱ्या स्वयंसेवकांची गरज आहे.
१९९२ मध्ये ट्रेकिंगच्या उपक्रमांद्वारे सुरेंद्र दिघे, सुमित्रा दिघे, सागर ओक, प्रकाश वैती, माधव जोशी आणि हेमकिरण देशमुख यांनी ‘जिज्ञासा’ची ठाण्यात मुहूर्तमेढ रोवली. पुढे मेजर सुभाष गावंड, चित्रकार शांताराम राऊत आणि चित्रा ओक या संस्थेत सहभागी झाले. १९९३ च्या दिवाळीत ‘शालेय जिज्ञासा’ विशेषांक प्रसिद्ध झाला. १९९४ मध्ये मेजर गावंड यांच्या प्रेरणेने छात्रसेना सुरू झाली. दर रविवारी छात्रसेनेची परेड होते. १९९५ मध्ये जिज्ञासाच्या पुढाकाराने ठाण्यातील काही शालेय विद्यार्थी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत सहभागी झाले. त्यानंतर दर वर्षी जिज्ञासाच्या वतीने विद्यार्थी नियमितपणे बालविज्ञान परिषदेत सहभागी होऊ लागले. पुढे ग्रामीण भागातील विद्यार्थीही परिषदेत वैज्ञानिक प्रकल्प सादर करू लागले. १९९८ मध्ये गणेश विसर्जनाचा तलावांवर होणारा परिणाम हा विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रकल्प विशेष गाजला. लघुपट स्वरूपात तो दूरदर्शनवरूनही प्रसारित करण्यात आला. त्यातूनच पुढे ठाण्यात २००३ मध्ये विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची संकल्पना पुढे आली. शालेय जीवनात जिज्ञासाच्या पुढाकाराने बालविज्ञान परिषदेत भाग घेऊन वैज्ञानिक प्रकल्प सादर करणारे निमिष साने, निरंजन करंदीकर, सुरुची बक्षी आणि अमृता नवरंगी आदी अनेक तरुण आता जगभरात विविध ठिकाणी संशोधन करीत आहेत. विज्ञानातील संज्ञा व्यवहारात आणून जीवन अधिक अर्थपूर्ण करण्याचे संस्कार जिज्ञासा विद्यार्थ्यांवर करते.
२२ डिसेंबर रोजी २१ वा वर्धापन दिन
२१ व्या वर्षांत पदार्पण करीत असल्याचे निमित्त साधून येत्या २२ डिसेंबर रोजी ठाण्यात एक विशेष जाहीर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. जिज्ञासा परिवारातील आजी-माजी विद्यार्थी, पालक तसेच हितचिंतक या सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती सुरेंद्र दिघे यांनी दिली.