येथील निसर्गमित्र संस्था व श्रीमंत छात्र जगतगुरू गुरुकुल विद्यालय (मठगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री वाचवा मोहिमेंतर्गत किल्ले, देवराई व जंगलभ्रमंतीचे आयोजन पाटगाव, मठगाव परिसरात करण्यात आले होते. निसर्ग सहलीत फटाके न उडविणाऱ्या करवीर, मुरगूड, अहमदनगर, सांगली, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यातून ७५ विद्यार्थी-ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला.
निसर्ग सहलीत पाटगाव परिसरातील विविध देवराईमधील जैवविविधतेची ओळख वनस्पतीतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी करून दिली. देवराईत सूर्यपक्षी, हॉर्नबिल, कोतवाल, बुलबूल, वेडा राघू आदी पक्षी व हरणटोळ, फुलपाखरे, कोळी इत्यादी कीटक व सर्प प्राणीही विद्यार्थ्यांना पाहायला मिळाले. देवराईतील मंदिराजवळील स्वच्छतेबद्दल सुरेश शिपूरकर यांनी माहिती विशद केली व शिबिरार्थीनी परिसर स्वच्छ केला. यावेळी नारायण डवर यांनी वनव्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले.
याचबरोबर वाघोबाचा खटला, निसर्ग व गणित, आहार आणि आरोग्य व सह्याद्री वाचवा विषयावर चित्रफितीद्वारे, डॉ. बाचूळकर, डॉ. अशोक वाली, प्रा. उमाकांत आवटे यांनी मार्गदर्शन केले. संतोषगड, रांगणागड, दर्शनगड इ. किल्लय़ांची माहिती डी. के. मोरसे यांनी दिली. या भ्रमंतीचे संयोजन अनिल चौगुले, डॉ. हरिष नांगरे, अनिल वेल्हाळ, संदीप अंकले, अवधूत वीर, खंडेराव भोसले, नितीन कारंज, विश्वास चौगुले, अजय अकोळकर, प्रसाद माळकर, केदार मुनिश्वर, प्रकाश चव्हाण, स्मिता िशदे, स्वाती नांगरेल, आशाताई चौगले, सीमा चौगले यांनी केले.