* सर्वाधिक ४५ जागा जिंकून कॉँग्रेस अव्वल, भाजपला २६ तर राष्ट्रवादीच्या ताब्यात केवळ ८ पंचायती
आगामी सार्वत्रिक निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून मानल्या गेलेल्या जिल्ह्य़ातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यमंत्री रणजीत कांबळे यांनाच आपला गढ राखण्यात यश झाले असून इतरांना संमिश्र यश मिळाले.
जिल्ह्य़ातील आठही तालुक्यातल्या १२० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी सायंकाळी घोषित झाले. यात कॉंग्रेसने सर्वाधिक म्हणजे ४५, तर भाजपचे त्या खालोखाल २६ ग्रामपंचायतींवर झेंडा फ डकविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला ८ व शेतकरी संघटनेला ३ ठिकाणी विजय मिळाला. कांॅग्रेस-रॉंका आघाडी सहा ग्रामपंचायतीत, तर सेना-भाजप युती दोन ठिकाणी विजयी ठरली.
शिवसेनेला केवळ एकाच ग्रामपंचायतीत यश मिळाल्याने आमदार अशोक शिंदेंची नामुष्की झाली. आठ ग्रामपंचायतीत इतर आघाडय़ा विजयी झाल्या. रणजीत कांबळे यांच्या देवळी-पुलगाव क्षेत्रात सहा ठिकाणी कांॅग्रेसला स्पष्ट बहुमत, तर दोन गावांमध्ये कॉंग्रेस-रॉंका आघाडीला विजय मिळाल्याने ग्रामीण मतदारांनी परत एकदा कांबळेंवर विश्वास टाकल्याचे स्पष्ट होते. या विभागात सेना-भाजपला केवळ एका गावावर वर्चस्व सिध्द करता आले, तर एक ग्रामपंचायत आघाडीकडे गेली.
कांबळे गटाने सेलू तालुक्यात १४ गावांवर कांॅग्रेसचा झेंडा फ डकविला, तर कांॅग्रेसच्याच दत्ता मेघे-शेखर शेंडे गटाला या तालुक्यात चार गावांवर वर्चस्व दाखविता आले. सेलू तालुक्यात राकॉं व भाजपला प्रत्येकी दोन ठिकाणी बहुमत मिळाले. वर्धा तालुक्यातही कांबळे समर्थकांनी आपले पाय रोवले. तालुक्यात कॉंग्रेस-३, राकॉं-२, कॉंग्रेस-राकॉं-१, भाजप-१, भाजप-सेना-१, भाजप-रिपाई-१, असे विविध पक्षांचे यश आहे.
आर्वी मतदारसंघात आमदार दादाराव केचे व माजी आमदार अमर काळे गटात चुरशीची लढत झाली. एकूण १८ ग्रामपंचायतींवर भाजपचा, तर १७ ठिकाणी कॉंग्रेसचा झेंडा फ डकला. आमदार केचेंना ही निवडणूक एक इशारा समजली जात असून अमर काळे आपली पकड मजबूत करीत असल्याचे म्हटले जाते. शेतकरी संघटनेला आर्वीत दोन, तर हिंगणघाट तालुक्यातील एकाच ग्रामपंचायतीवर यश मिळाल्याने संघटनेत अद्याप धुगधुगी असल्याचे दिसून आले.
वध्र्यालगतच्या पिपरी (मेघे) येथील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. भाजपचे जि.प.गटनेते श्याम गायकवाड यांच्या या प्रभागात कांॅग्रेसला यश मिळाले. माजी सरपंच सतीश ईखार यांनी स्वत: विजयी होत बहुमत मिळविले. अजय गौळकार, विद्या कळसाईत, राजेश राजूरकर, कविता जाधव, वंदना पेंदाम हे काही महत्वाचे विजयी उमेदवार आहेत. कांबळे वगळता एकाही कांॅग्रेस, भाजप व राकॉं नेत्याला दणदणीत यश लाभू शकलेले नाही. राकॉंचे सहयोगी आमदार प्रा.सुरेश देशमुख यांना वर्धा-सेलू प्रभागात अपेक्षेएवढे यश मिळाले नाही. सर्व ग्रामपंचायतीत शांततेत मतदान पार पडल्यावर निकालाच्या घोषणेनंतरही कुठे अनुचित घटना घडली नाही.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर वर्षभरानेच झालेल्या या सार्वत्रिक निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले होते.