‘डिनर डिप्लोमसी’मध्ये प्रसार माध्यमाबाबत बोललो नाही

निधी संकलनासाठी शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री आम आदमी पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये अरविंद केजरीवाल यांनी प्रसार माध्यमांवर टीका करून आपले सरकार आले तर माध्यमांच्या प्रतिनिधींना कारागृहात टाकू असे विधान केले.

निधी संकलनासाठी शहरातील एका आलिशान हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री आम आदमी पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डिनर डिप्लोमसी’मध्ये अरविंद केजरीवाल यांनी प्रसार माध्यमांवर टीका करून आपले सरकार आले तर माध्यमांच्या प्रतिनिधींना कारागृहात टाकू असे विधान केले. शुक्रवारी सकाळी मात्र असे काही बोललोच नाही, असे सांगून त्यांनी घूमजाव केले.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे मुख्य समन्वयक अरविंद केजरीवाल दोन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असताना पक्षाच्या निधी संकलनासाठी शहरातील आलिशान हॉटेलमध्ये गुरुवारी रात्री खास एका मेजवानीचे आयोजन केले होते. जे लोक १० हजार रुपये देतील त्यांना अरविंद केजरीवाल यांच्यासोबत जेवणाचा आनंद घेता आणि चर्चा करता येईल असे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे पक्षाने शहरातील काही उद्योजक आणि इंडिया अंगेस्ट करप्शनमध्ये असलेल्यांना आमंत्रित केले होते. दीडशे ते दोनशे लोक राहतील अशी आम आदमी पक्षाच्या संयोजकांना आशा असताना प्रत्यक्षात मात्र ७० ते ८० लोक उपस्थित असल्याची माहिती मिळाली. त्यात प्रत्यक्षात दहा हजार रुपये देणाऱ्यांची संख्या चाळीस ते पन्नास असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रानी दिली. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात सहभागी झालेले अनेक लोक प्रारंभीच्या काळात केजरीवाल यांच्यासोबत गेले नव्हते मात्र, त्यातील काही लोकांना केजरीवाल यांच्यासोबत जेवणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये अण्णा समर्थकांची संख्या जास्त होती. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद साधताना केजरीवाल म्हणाले, लोकसभा निवडणुकीचे वातावरण असताना आम आदमी पक्षाला बदनाम करण्यासाठी प्रसार माध्यम प्रयत्न करीत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी मीडियासोबत संगनमत केल्यामुळे त्यांच्या विरोधात प्रसार माध्यम काहीच बोलत नाही. मात्र, आम आदमी पक्षाला लक्ष्य केले जात आहे. आम आदमी पक्षाचे सरकार आले तर काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कारागृहात टाकू असे विधान केजरीवाल यांनी केले होते. या विधानावर सर्व स्तरातून टीका झाल्यानंतर केजरीवाल यांनी शुक्रवारी सकाळी दीक्षाभूमीला भेट दिली त्यावेळी त्यांनी मी असे काहीच बोललोच  नाही असे सांगून त्यांनी घूमजाव केले.
दरम्यान, हॉटेल तुली इंटरनॅशनलसमोर केजरीवाल यांच्यासोबत भोजनाचा कार्यक्रम सुरू असताना आम आदमी पक्षातून बाहेर पडलेल्या अनेक कार्यकत्यार्ंनी काळे झेंडे दाखवून धुमाकूळ घातला. यावेळी हॉटेलच्या बाहेर दहा रुपयात झुणका भाकर केंद्र सुरू करून केजरीवाल याचा निषेध केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Kejriwal statement about media