संस्कार भारती, ताल साधना समूह, धरमपेठ गृहनिर्माण सहकारी संस्था आणि अधिवक्ता परिषदेच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ आणि १० ऑगस्टला लक्ष्मीनगरातील सायंटिफिक सभागृहात शां.न. खिरवडकर स्मृती द्विदिवसीय शास्त्रीय संगीत समारोह आयोजित करण्यात आला आहे. समारोहाचे उद्घाटन श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. स्नेहल पाळधीकर यांच्या हस्ते शुक्रवारी, ९ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजता करण्यात येईल. समारोहाच्या अध्यक्षस्थानी संगीत महामहोपाध्याय पं. प्रभाकर देशकर राहतील.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या कलासाधकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने आयोजित या संगीत महोत्सावात संगीताच्या विविध कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
प्रथम सत्रात ९ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता नागपूरचे युवा गायक योगेश दिवे यांचे शास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्यावर मिलिंद इंदूरकर आणि संवादिनीवर संदीप गुरमुळे साथ देणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमात उरुखाबाद घराण्याचे तबलावादक पं. शुभंकर बॅनर्जी यांचे स्वतंत्र तबलावादन होईल. शिरीष भालेराव हे त्यांना लहरासंगत करतील.
द्वितीय सत्रात शनिवारी, १० ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता पुण्याच्या प्रख्यात गायिका सावनी शेंडे-साठय़े यांचे गायन होणार आहे. किराणा आणि ग्वाल्हेर घराण्याची गायकी त्यांच्या शास्त्रीय गायनातून ऐकायला मिळणार आहे. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर तर संवादिनीवर श्रीकांत पिसे साथसंगत करतील. रसिकांनी या नि:शुल्क मैफिलीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने कांचन गडकरी, वीरेंद्र चांडक, श्याम देशपांडे, मनोज श्रौती, गजानन रानडे, श्रीकांत बंगाले, रवी सातफळे, अ‍ॅड. मोहन किन्हेकर, अशोक दवंडे आदींनी केले आहे.