विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात भूमाफियांनी कल्याण-डोंबिवलीतील मोक्याच्या जागा, भूखंडांवर चाळी, इमारती, गाळे बांधून जागा हडप करण्याचा उद्योग केला आहे. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा या माफियांनी उचलला आहे. उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष गेले तर अडचण नको म्हणून अनधिकृत बांधकामांना रंगरंगोटी, निवारा शेड, जुन्या टाइल्स, रंग देण्याचे काम सुरू केले आहे. या बांधकामांमध्ये भाडेकरू, भंगार दुकाने सुरू करण्याचा उद्योग भूमाफियांनी सुरू केला आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर, लगेच दिवाळी, त्यानंतर पुढील आठवडय़ात या अनधिकृत बांधकामांची माहिती पालिका अधिकाऱ्यांना खबऱ्यांकडून मिळेल, असा विचार करून पालिकेच्या राखीव जागा, इमारतींचे कोपरे, मोकळ्या जागांवर बांधलेल्या या बांधकामांना रंगरंगोटी, तेथे लगेच भाडेकरू ठेवणे, दुकान सुरू करणे असे उद्योग सुरू करण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकामात कोणी राहत असेल तर त्यावर कारवाई करतान पालिका अधिकाऱ्यांना अनेक अडथळे येतात. तोच फायदा माफियांनी उचलला आहे. काही बांधकामे पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने करण्यात आली असल्याचे बोलले जाते. अनधिकृत बांधकाम विभागातील काही स्थानिक कर्मचारी आणि वरचा साहेब यांच्या हातमिळवणीचा आशीर्वाद या अनधिकृत बांधकामांना असल्याचे बोलले जाते.
नव्याने उभारण्यात आलेली बांधकामे जुनी आहेत हे दाखवण्यासाठी माफियांनी जुन्या लाद्या, जुन्या टाइल्स, मार्बल, जुनाट रंग यांचा खुबीने वापर केला आहे. दिवाळीनंतर पालिका अधिकारी ही बांधकामे कशी शोधून काढून त्यावर कारवाई करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 1st Nov 2014 रोजी प्रकाशित
अनधिकृत बांधकामांची रंगरंगोटीने पाठराखण
विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात भूमाफियांनी कल्याण-डोंबिवलीतील मोक्याच्या जागा, भूखंडांवर चाळी, इमारती, गाळे बांधून जागा हडप करण्याचा उद्योग केला आहे.
First published on: 01-11-2014 at 01:02 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land mafia in kalyan grab the corporation plots after making construction