तुळजाभवानी मंदिरासमोरील मोकळ्या जागेची संचिका धूळखात!

काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हय़ात मांढरदेवी दुर्घटना घडल्यानंतर तुळजाभवानी मंदिरासमोर १०० मीटरचा परिसर मोकळे पटांगण ठेवण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासह ५६ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे करून या बाबतची संचिका धूळखात ठेवण्यात आली.

काही वर्षांपूर्वी सातारा जिल्हय़ात मांढरदेवी दुर्घटना घडल्यानंतर तुळजाभवानी मंदिरासमोर १०० मीटरचा परिसर मोकळे पटांगण ठेवण्याची शिफारस करण्यात आली. मात्र, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासह ५६ घरांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुढे करून या बाबतची संचिका धूळखात ठेवण्यात आली. नगरविकास विभागात आक्षेपांच्या पूर्ततेसाठी वर्ष कशाला लागते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणी सुनावणी घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, कार्यकर्त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झाल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मंदिरासमोरील १०० मीटर मोकळ्या जागेचा मुद्दा मागील अडीच वर्षांपासून चच्रेत होता. नगरपालिकेने या अनुषंगाने प्रस्तावही तयार केला होता. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी मांढरदेवीप्रमाणेच तुळजापूर येथेही चेंगरीचेंगरी होऊ शकते, असा अहवाल पाठविला होता. राज्यात मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी व त्याचे नियोजन या अनुषंगाने राज्य सरकारकडे सादर झालेल्या न्या. कोचर यांच्या अहवालातही मंदिरासमोरील जागा मोकळी ठेवावी, अशा सूचना होत्या. मात्र, मोकळी जागा १०० मीटर की ५० मीटर यावर बरीच चर्चा झाली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या हितासाठी यावर निर्णयच होऊ नयेत, एवढय़ा संथगतीने संचिका हलविली गेली. परंतु ही चेंगराचेगरीची घटना घडल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजितसिंह यांनी सांगितले की, मंदिरासमोर मोकळी जागा अधिक असायला हवी, या अनुषंगाने प्रशासनाने पाठविलेल्या अहवालाकडे अधिक सजगपणे पाहिले गेले असते तर ही घटना घडली नसती. यापूर्वी तुळजापूर तीर्थक्षेत्र संवेदनशील म्हणून गृह खात्याच्या रडारवर असताना व १ हजार ६०० पोलीस कर्मचारीवर्गाचा अत्याधुनिक साधनसामुग्री बाळगणारा बंदोबस्त तनात असूनही दुर्घटना घडली. त्यामुळे पोलीस, महसूलसह मंदिर संस्थानचे सुरक्षेचे व यंत्रणा सज्ज बाबतचे दावे फोल ठरले आहेत. शनिवारी पालकमंत्री चव्हाण घटनास्थळी भेट देण्यास आले. मात्र, जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे व व्यवस्थापक सुजित नरहरे या वेळी उपस्थित नव्हते.
राजे शहाजी महाद्वारास पूर्वीपासून दरवाजाच नव्हता. जुनी प्राचीन कमान एवढीच ऐतिहासिक वास्तू येथे असताना प्रशासनाने लोखंडी दरवाजे बसविले. दुसरे महाद्वार राजमाता जिजाऊ दरवाजा मंदिर प्रशासनाने पूर्ण बंद करून येथे सतत पोलीस पहारा तनात केला आहे. याच्या परिणामी दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांच्या गर्दीचा ताण केवळ राजे शहाजी दरवाजा असलेल्या प्रवेशद्वारावर पडत आहे. महाद्वारासमोरील लाकडी बॅरिगेटिंगही या घटनेमुळे वादात सापडले आहे. मंदिराचा दरवाजा बंद करण्याचा आदेश कोणी दिला, दरवाज्याला कुलूप लावले होते का, त्या दरवाज्याची चावी कोणाकडे असते, याशिवाय दरवाजा लावण्याची गरज होती का, असे प्रश्न शनिवारी पत्रकार बैठकीत विचारण्यात आले. त्यास पालकमंत्री चव्हाण, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना व्यवस्थित उत्तरे देता आली नाहीत. मात्र, एकूणच प्रशासनातील अनागोंदीमुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. त्यामागे धूळखात पडलेल्या संचिकांचा मोठा वाटा असल्याचा आरोप तुळजाभवानी मंदिरातील महामंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Lie of open land file infront of the tuljabhawani temple

ताज्या बातम्या