चकचकीत जीवन हे तात्कालिक असते. आपल्या कामातून आपणास सन्मान आणि आर्थिक पाठबळ मिळेल अशा प्रकारच्या जीवन पध्दतीचे प्रत्येक महिलेने नियोजन करावे. यशस्वी जीवनाचा हा मूलमंत्र आहे, असे प्रतिपादन स्त्री मुक्ती संघटनेच्या डॉ. करूणा गोखले यांनी  येथे केले.
ज्ञानदीप स्त्री जागृती मंचतर्फे ‘आम्ही मायलेकी’ या कार्यक्रमांतर्गत एकटय़ा महिलांची धडाडी, त्यांची मुले-मुली करीत असलेली प्रगती आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाचे श्रीखंडेवाडीतील श्री साई शुभ कार्यालय येथे आयोजन केले होते. या वेळी ‘लोकसत्ता’ चतुरंग पुरवणीच्या संपादिका आरती कदम, मंचच्या संस्थापिका भारती मोरे, सामाजिक कार्यकर्त्यां शिल्पा कशेळकर, अध्यक्षा सुनेत्रा दिढे उपस्थित होत्या. एकल आईच्या मुलांना मार्गदर्शन करताना डॉ. गोखले यांनी आपल्या अस्तित्वाचे नियोजन करणाऱ्या पावसाच्या तीन थेंबांचे उदाहरण दिले. आयुष्याची शिदोरी म्हणून पुरेल अशा व्यवसाय, नोकरीची निवड करा. चकचकीत जीवनाचा काळ हा ठराविक असतो. तो आपल्या आयुष्याला पुरे पडणारा नसतो. त्यामुळे मॉडेलिंगसारख्या व्यवसायाची निश्चिती करताना मुलींनी गांभीर्याने विचार करावा. आईशिवाय पाठबळ नसलेल्या मुलींनी शक्यतो शिक्षिका, परिचारिका, पत्रकार, सामाजिक कार्य स्वरूपाच्या नोक ऱ्यांचा प्राधान्याने विचार करावा, असे डॉ. गोखले यांनी सांगितले.
‘एकत्र कुटुंब पध्दतीमुळे घरात तीस ते चाळीस माणसांचा यापूर्वी राबता असायचा. घरात गोकुळ फुललेले असायचे. बदलत्या काळाप्रमाणे लोप पावत चाललेली एकत्र कुटुंब व्यवस्था, काही कौटुंबिक समस्यांमुळे अनेक महिला आता आपल्या मुलांसह धाडसाने कौटुंबिक वाटचाल करीत आहेत ही निश्चित कौतुकास्पद बाब आहे. अशा एकल कुटुंबातील महिला, मुलांना ज्ञानदीप स्त्री मंचच्या सारख्या संस्थांकडून मिळणारा आधार हीही कौतुकाची गोष्ट आहे, असे मत आरती कदम यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमात निबंध स्पर्धेतील यशस्वी एकल महिलांच्या मुलांचा सन्मान करण्यात आला. गेले १८ वर्षांपासून संस्थेच्या सुरू असलेल्या कार्याचा आढावा भारती मोरे यांनी घेतला.