वाणिज्य व कला शाखेच्या द्वितीय वर्षांत बहिस्थ प्रवेश प्रक्रिया राबविण्यास पुणे विद्यापीठ टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ गुरूवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्रास टाळे ठोकले. पुणे विद्यापीठाचा कारभार गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडत असताना प्रशासनाकडून त्यात सुधारणा होण्याच्या दृष्टिकोनातून कोणतेही प्रयत्न केले जात नाही. वाणिज्य व कला शाखेतील बहिस्थ विद्यार्थ्यांची रखडलेली प्रवेश प्रक्रिया हे त्याचेच एक उदाहरण.
साधारणत: पंधरा दिवसांपूर्वी विद्यापीठाने कला व वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. द्वितीय वर्षांची प्रवेश प्रक्रिया लगोलग सुरू व्हावी, अशी अपेक्षा होती. तथापि, आजतागायत त्या दिशेने कोणतीही पावले पडताना दिसत नाही. या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सातत्याने निवेदने देऊन आंदोलने करत आहे. काही दिवसांपूर्वी संघटनेने या प्रश्नावरून विद्यापीठाच्या नियंत्रकांना घेराव घातला होता. त्यावेळी विद्यापीठाने ३० सप्टेंबपर्यंत ही प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्या बाबतची माहिती आणि अर्ज उपरोक्त दिवशी संकेतस्थळावर प्रकाशित केली जाईल, असेही सांगण्यात आले. मात्र, ही तारीख उलटून गेल्यानंतर प्रवेश प्रक्रिया काही सुरू होऊ शकली नाही. या पाश्र्वभूमीवर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष चिन्मय गाडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते पालिका बाजारातील विद्यापीठाच्या विभागीय केंद्रावर धडकले. विभागीय केंद्राच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून विद्यापीठाच्या कार्यशैलीचा सर्वानी निषेध केला. अचानक झालेल्या आंदोलनामुळे कार्यालयात एकच गोंधळ उडाला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यानच्या काळात पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. बहिस्थ प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे, अशी तक्रार गाडे यांनी केली. आंदोलनात किरण जगझाप, दत्तु गायकर, रवी खैरे आदी सहभागी झाले होते.