इन्स्पायर कार्यशाळेचा समारोप
संशोधनाचा पाया भक्कम असेल तर विकासाला वेळ लागत नाही, असे सांगतानाच ग्रामीण विद्यार्थ्यांनी संशोधक म्हणून करिअर करण्याची गरज असल्याचे मत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांनी व्यक्त केले.
केंद्र सरकाचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, तसेच टाकळी ढोकेश्वर येथील ढोकेश्वर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर कार्यशाळेचा समारोप डॉ. ताकवले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे होते. महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजीराव देवढे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. सहदेव आहेर यांनी कार्यशाळेची भूमिका विषद केली.
ग्रामीण भागातून मुलभूत संशोधक पुढे यावेत यासाठी केंद्र सरकारने इन्स्पायर कार्यशाळेचा कार्यक्रम हाती घेतल्याचे सांगून डॉ. ताकवले म्हणाले, संशोधन पेपर प्रसिद्घीनंतर तंत्रज्ञान व विकास हे सूत्र अतिशय महत्वाचे आहे याची नोंद विद्यार्थ्यांंनी घेतली पाहिजे. सध्या ज्ञानाच्या कक्षा वेगाने वाढत आहेत, दररोज नवीन बदल होत आहेत. त्यामुळे संशोधक होण्यासाठी केवळ एकाच विषयाकडे लक्ष देण्यापेक्षा सर्व विषयांचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. आपल्या विषयाच्या चौकटीबाहेर पडून अभ्यास केल्यास व्यापक क्षेत्रात नक्कीच यशस्वी होता येईल.
चांगले शास्त्रज्ञ होण्याची मनिषा बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांंनी डिझेल-पेट्रोल विरहीत इंधनावर चालणारी वाहने संशोधित करण्याचे आवाहन खानदेशे यांनी केले. संपदा गाढे (शेवगाव), शामली फंड (राजगुरूनगर), विशाखा रत्नपारखी (प्रवरानगर), अभिजीत आहेर (शिरूर), स्नेहल खोडदे, अक्षदा गोरे व मयूर औटी (नगर), तसेच स्नेहल बारहाते (कोपरगाव) या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत आपले विचार मांडले.
संस्थेचे विश्वस्त सीताराम खिलारी, रामचंद्र दरे, उपप्राचार्य विरेंद्र घनशेट्टी, नवोदय विद्यालयाचे प्राचार्य सुनीलकुमार नल्ला, प्रा. विजया ढवळे, प्रा. एम. बी. सय्यद, प्रा़ कावेरी साबळे, प्रा. राणी शेख आदी यावेळी उपस्थित होते.