ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात नेमणुकीवर असल्याने दोघांची ओळख, त्यातून त्या दोघांचे एकमेकांशी प्रेम झाले आणि त्याचे पुढे लग्नातही रूपांतर झाले. विशेष म्हणजे, त्याचे पहिले लग्न झालेले असल्याने तिच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नास विरोध केला, पण तिने प्रेमाखातर त्याच्याशी लग्न केले. त्यास पहिल्या पत्नीची संमती मिळाली. मात्र त्याने तिच्या प्रेमाचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करीत तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागला आणि यातूनच तिने आत्महत्येचा पर्याय निवडला. ज्या पोलीस ठाण्यातून प्रेमाची अनेक स्वप्ने रंगवली होती, त्याच पोलीस ठाण्यात तिने डोक्यात गोळी झाडून प्रेमाचा अंत केला. ही करुण कहाणी आहे पोलीस शिपाई वैशाली पिंगट हिची.
ठाणे येथील समतानगर भागात पोलीस शिपाई वैशाली पिंगट राहत होती. २०१२ मध्ये ती पोलीस दलात भरती झाली आणि त्याच वर्षी तिचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर २५ डिसेंबर २०१२ रोजी ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात तिची नेमणूक झाली. याच पोलीस ठाण्यात २००८ पासून पोलीस शिपाई विजय लिंगायत कार्यरत होता. त्याच्यासोबत तिची ओळख झाली आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. या दोघांनी प्रेमाची अनेक स्वप्ने रंगवली. विजयचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा आहे. असे असतानाही तिने त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यास विजयची पहिली पत्नी सविता हिनेही संमती दिली. या लग्नास वैशालीच्या वडिलांचा विरोध होता. त्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्नही केला होता, पण त्याच्या प्रेमात बेभान झालेल्या वैशालीने अखेर त्यांच्याशी लग्न केले. चार महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर ती त्याच्यासोबत टिटवाळा येथे राहत होती. या लग्नानंतर विजयने तिच्याकडे टिटवाळा येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला आणि या मागणीसाठी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला.

वैशालीचे वडील ताराचंद पिंगट मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कामाला होते. २०१३ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत पुणे जिल्ह्य़ातील बेल्हा या मूळ गावी राहण्यास गेले होते. अधूनमधून ठाण्यात येऊन ते वैशालीची भेट घेऊन जात असत. त्या वेळी तिने विजयच्या छळाविषयी त्यांना सांगितले होते. त्यामुळे त्यांनी २७ जानेवारीला सव्वा लाख रुपयांचा धनादेश वैशालीला दिला होता. येत्या १० फेब्रुवारीला हा धनादेश वटण्याची तारीख होती. पण वैशालीने तो आपल्या खात्यात जमा केला नव्हता. या प्रकारामुळे तसेच विजयच्या जाचामुळे ती अस्वस्थ होती. यातूनच तिने शनिवारी रात्री पोलीस ठाण्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे, अशी माहिती नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर. ए. भालसिंग यांनी दिली. या प्रकरणी वैशालीचे वडील ताराचंद पिंगट यांनी तक्रार दिली असून त्यानुसार, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून विजयला अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.