शहरातील दलित नगरसेवकांना ‘डी गँग’ म्हणून संबोधल्याप्रकरणी खासदार चंद्रकांत खैरे यांनी नगरसेवक व कार्यकर्त्यांसमोर अखेर सपशेल गुडघे टेकले! दलित अत्याचार विरोधी कृती समितीने ‘डी गँग’ या शब्दावर आक्षेप घेत थेट गुलमंडीवर निदर्शने केली. आंदोलनातील आक्रमकपणा लक्षात येताच खैरे यांनी ‘डी’ शब्दाचा अर्थ ‘दर्डा गँग’ असे नमूद केले आणि याच खुलाशात दर्डांचा व या नगरसेवकांचा कोणताही संबंध नसल्याचे लक्षात आल्याने दलित नगरसेवक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा गैरसमज दूर व्हावा, म्हणून ‘ते’ वक्तव्य मागे घेत असल्याचे लेखी मान्य केले.
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक मिलिंद दाभाडे व अमित भुईगळ या दोघांनी महापालिकेचे वाटोळे करणाऱ्या खासदार खैरे यांचा निषेध करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर चिडलेल्या खैरे यांनी या नगरसेवकांना ‘डी गँग’ अशी उपमा दिली. परंतु ‘डी’ म्हणजे दलित असा अर्थ काढला गेल्याने शहरातील सर्व दलित नगरसेवक खैरे यांच्या विरोधात संघटित झाले. दाभाडे, भुईगळ, राजू शिंदे यांच्यासह दलित नगरसेवकांनी खैरे यांनी माफी मागावी, अशी आग्रही भूमिका मांडली. त्यानंतर ‘डी’ म्हणजे दर्डा असा खुलासाही खैरे यांनी केला.
मंगळवारी गुलमंडी व मछली खडक भागात दलित नगरसेवकांनी खैरे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. खासदारांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे, अशी थेट मागणी केल्याने प्रकरण चिघळले. खैरे यांच्या कार्यालयासमोर या वेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी होती. नगरसेवक, पदाधिकारी, शाखाप्रमुख जमल्याने पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला. दुपारी एकच्या सुमारास खैरे यांच्याकडून आंदोलनकर्त्यांकडे खुलाशाचे पत्र पाठविले गेले. या पत्राचे जाहीर वाचन करण्यात आले. दलित नगरसेवकांनी थेट आंदोलन उभे केल्याने खैरे यांनी गुडघे टेकल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत होती.