सोमवारी मध्यरात्री हंसापुरीत गोळीबार करून थरार निर्माण करणाऱ्या ईप्पा टोळीतील एकाला तहसील पोलिसांनी अटक केली. ज्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला त्या मन्सूर काल्या ऊर्फ मोहम्मद मन्सूर वकील सिद्दिकी (३०) याच्या घरातूनही पोलिसांनी एक माऊझर जप्त केले.
मोमीनपुऱ्यातील गुंड ईप्पा ऊर्फ इरफानने त्याच्या पाच ते सात साथीदारांसह सोमवारी मध्यरात्री मन्सूरच्या घरावर हल्ला चढवला होता. ईप्पाने माऊझरमधून गोळ्या झाडल्या, तर त्याच्या साथीदारांनी मन्सूरच्या घराबाहेर असलेल्या दोन मोटारसायकलची तोडफोड केली. अर्धा तास ईप्पाचे साथीदार परिसरात हैदोस घालत होते. मन्सूर काल्याच्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी मंगळवारी ईप्पा व त्याच्या साथीदारांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे शाखेच्या पथकाने ईप्पाचा साथीदार जब्बार ऊर्फ सोहेल अन्सारी नवाब अन्सारी याला अटक केली. ईप्पा आणि त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, मन्सूर काल्याच्या घराची झडती घेतली असता पोलिसांना एक माऊझर आढळले. पोलिसांनी ते जप्त करून त्यालाही अटक केली. पोलीस आयुक्त के.के. पाठक, सहआयुक्त संजय सक्सेना, सुनील कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक माधव गिरी, पोलीस उपनिरीक्षक बाबा गोस्वामी, राज चौधरी, शैलेश पाटील, संजय परमार यांनी ही कामगिरी बजावली
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2014 रोजी प्रकाशित
हंसापुरीत गोळीबार करणाऱ्या ईप्पा टोळीतील एकास अटक
सोमवारी मध्यरात्री हंसापुरीत गोळीबार करून थरार निर्माण करणाऱ्या ईप्पा टोळीतील एकाला तहसील पोलिसांनी अटक केली.
First published on: 12-04-2014 at 12:48 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man alleged firing arrested