कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांना अभिवादन, कुसुमाग्रज पहाट, काव्य पुष्पांजली, साहित्यिकांचे चित्र प्रदर्शन, शाळा व महाविद्यालयात खास कार्यक्रम अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून गुरुवारी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तथा मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मनसेच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
गुरुवारी महापालिकेच्या आवारात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कवी कुसुमाग्रज उद्यानात विद्यार्थ्यांच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम झाला. या वेळी कवी कुसुमाग्रजांच्या कवितेच्या प्रतिमा देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी नगरसेवक, विभागीय अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानसह विविध संस्था, ग्रंथालय, शासकीय कार्यालये, शाळा व महाविद्यालये या ठिकाणी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने सकाळी साडेपाच वाजता आयोजित कुसुमाग्रज पहाट कार्यक्रमात रसिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. हुबळी येथील पंडित कृष्णेंद्र वाडीकर यांच्या गायनाला अनिल दैठणकर यांच्या व्हायोलिनवादनाच्या साथीने कुसुमाग्रज स्मरण कार्यक्रमास सुरुवात झाली. याप्रसंगी प्रतिष्ठानचे कार्यवाह लोकेश शेवडे, सहकार्यवाह विनायक जोशी, कवी किशोर पाठक, हर्षवर्धन कडेपुरकर उपस्थित होते. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमांतर्गत विदर्भ, चंद्रपूर, आनंदवन, नागपूर अशा १३ ठिकाणी ग्रंथपेटय़ांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कुसुमाग्रज स्मारकात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन, पक्षाच्या राजगड कार्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच दुपारी ‘जागर मराठीचा’ कार्यक्रमांतर्गत शहर परिसरातून दिंडी काढण्यात आली. सायंकाळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठी जनांचा सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. शरद उपाध्ये यांच्या ‘राशिचक्र’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सागरमल मोदी प्राथमिक शिक्षण मंदिरात मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून आयोजित मराठी साहित्यिक तसेच क्रांतिकारकांच्या चित्रमय प्रदर्शनातही नागरिक व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. पुणे विद्यार्थिगृहाच्या शिक्षणशास्त्र आणि संशोधन महाविद्यालयात मराठी दिनानिमित्त प्रकाश वैद्य व प्रशांत केंदळे यांच्या मार्गदर्शनाने मराठी दिन समारोहाचे आयोजन करण्यात आले. या निमित्त विद्यार्थी, शिक्षकांनी बनविलेल्या भित्तिचित्र व पुस्तकांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले