क्लीन अ‍ॅण्ड सेव्ह फुटाळा

तूर्यनाद ही रणदुंदुभी तर तिच्या जोडीला नव्या-जुन्या पिढीची चित्रपट गाणी सादर करून भारतीय वायुसेनेच्याएअर वॉरिअर सिंफोनी वाद्यवुंद्याने शनिवारी हजारो नागपूरकरांचे मनोरंजन केले.

तूर्यनाद ही रणदुंदुभी तर तिच्या जोडीला नव्या-जुन्या पिढीची चित्रपट गाणी सादर करून भारतीय वायुसेनेच्याएअर वॉरिअर सिंफोनी वाद्यवुंद्याने शनिवारी हजारो नागपूरकरांचे मनोरंजन केले. या माध्यमातून ‘क्लीन अ‍ॅण्ड सेव्ह फुटाळा’चा संदेशही दिला.
फुटाळा जलायशाच्या काठावर शनिवारी सायंकाळनंतर हा कार्यक्रम झाला. प्रारंभी वायु अधिकाऱ्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वागतार्थ मार्शल धून सादर करण्यात आली. एस.पी. राजन यांनी मेलोडी सादर करून कार्यक्रमाचा प्रारंभच बहारदार करून टाकला. ‘मेरा नाम चिन चिन चिम’, ‘सुनो ना संग’, ‘तुमसा नही देखा’, ‘है अपना दिल तो आवारा’, ‘हुस्न के लाखो रंग’, ‘किसी के मुस्कुराह पे’, ‘जाने कहा मेरा’ आदी जुन्या पिढीतील अजरामर गीतांचे या वाद्यवृद्यांमधील वादकांनी वादन करून वातावरणात रंग भरला. त्यानंतर ब्राझिलच्या पारंपरिक नृत्यावर आधारित एक रचना या कलावंतांनी सादर करून ‘वसुधैव कुटुंबकम’चा प्रत्यय दिला.
पुन्हा ‘गुलाबी आँखे’, ‘सुन रहा’, ‘गोरे गोरे’ व ‘तुने मारी एंट्री यार’ आदी हिंदी चित्रपट गीतांचे वादन याबरोबरच तूर्यनाद ही रणदुंदुभी तसेच विविध सैनिकी धून सादर या वादकांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले. वायुसेनेच्या या कार्यक्रमात शालिनता होती. तरुणांची उपस्थिती मोठी असली तरी धांगडधिंगा नव्हता. विदेशी गाणी आणि डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणांनीही या गाण्यांचा आस्वाद घेत वाद्यवृद्यांतील सैनिकी कलावंतांचा उत्साह वाढविला.
‘वंदेमातरम’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचालन फ्लाइंट लेफ्टनंट परविंदर यांनी केले. देशाच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या वायुसेनेच्या अनुरक्षण कमांडने सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सामाजिक तसेत देशभक्ती जागृती व त्याच जोडीला लष्कराप्रति तरुणांमध्ये ओढ निर्माण व्हावी, या उद्देशाने या वाद्यवृंदाचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित केले जातात.
या ‘एअर वॉरिअर सिंफनी ऑर्केस्ट्रा’च्या माध्यमातून सेनेप्रति जागृतता आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. केवळ शिपाईच नव्हे तर अनेक अधिकारी या पथकात आहेत. नागपूरने वायुसेनाच नव्हे तर लष्कराला अनेक मोठे व कुशल अधिकारी दिले आहेत. असे कार्यक्रम पुन्हा-पुन्हा आयोजित व्हावे, अशी अपेक्षा कार्यक्रमाला उपस्थित हजारो नागपूरकर व्यक्त करीत होते. अनुरक्षण कमांड मुख्यालयाचे प्रमुख वायू अधिकारी एअर मार्शल पी. कनकराज, संरक्षण खात्याचे जनसंपर्क अधिकारी विंग कमांडर समीर गंगाखेडकर यांच्यासह नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे, आदिवासी कल्याण खात्याच्या अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे व अनेक गणमान्य अधिकारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Message of the indian air force