मुंबईतील मोकळी जागा कमी झाल्याने गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’च्या सोडतीमधील मुंबई पालिका क्षेत्रातील घरांची संख्या रोडावली आहे. परंतु आता पुढच्या वर्षी, म्हणजेच २०१५ मध्ये मुंबईत सुमारे पाच हजार घरे सर्वसामान्य मुंबईकरांना उपलब्ध होतील, असा अंदाज आहे. अर्थात मोकळी जागा कमी झाल्याने ‘म्हाडा’च्या पुनर्विकास प्रकल्पांतून यातील बहुतांश घरे उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे आवाक्याबाहेर गेले असताना ‘म्हाडा’च्या घरांची दरवर्षी कमी होत असलेली संख्या आणि त्यांचे बिल्डरांशी स्पर्धा करणारे दर हा चिंतेचा आणि टीकेचा विषय झाला आहे. या पाश्र्वभूमीवर पुढच्या वर्षी तरी ‘म्हाडा’ मुंबईत तब्बल पाच हजार घरे मुंबईकरांसाठी घेऊन येणार ही निश्चितच आनंदाची बाब आहे. यंदाच्या सोडतीत मुंबईतील अवघ्या ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांसाठी सोडत काढण्यात आली आहे. तर मागच्या वर्षी म्हणजेच २०१३ मध्ये १२४४ घरांसाठी सोडत काढण्यात आली होती. आता मुंबईत ठिकठिकाणी सुरू असलेल्या ‘म्हाडा’च्या प्रकल्पांमधून सुमारे दोन हजार घरे मिळतील अशी अपेक्षा आहे. तर तब्बल तीन हजार घरे ही पुनर्विकास प्रकल्पातून मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबईत ‘म्हाडा’ने आता मोठय़ाप्रमाणात पुनर्विकास प्रकल्प राबवण्यास सुरुवात केली आहे. गोरेगाव येथील सिद्धार्थ नगर वसाहतीच्या पुनर्विकासातून रहिवाशांच्या पुनर्वसनानंतर खुल्या बाजारात सर्वसामान्यांना विक्रीसाठी ‘म्हाडा’ला दोन हजार घरे उपलब्ध होतील आणि ती २०१५ च्या सोडतीत समाविष्ट करता येतील असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर पूर्व उपनगरात मुलुंडजवळ सुमारे एक हजार घरे उपलब्ध होण्याची आशा आहे.
मुंबईकरांना मुंबईत ‘म्हाडा’ची घरे उपलब्ध झाली आणि त्यांची किंमत रास्त ठेवण्यात आली तर कृत्रिमरित्या चढवण्यात आलेले मुंबईतील घरांचे दर थोडे कमी होतील अशी अपेक्षा आहे.