गोदावरी कालव्यांचे पाणी कमी होऊन येथील शेती उद्ध्वस्त होत असताना जिल्ह्य़ातील जबाबदार मंत्री आणि लोकप्रतिनिधी विधिमंडळात मूग गिळून बसले आणि आता त्याची स्पष्टीकरणे देऊन आम्ही त्या पापाचे वाटेकरी नाहीत अशी दर्पोक्ती करू लागले, असे प्रतिपादन प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सचिव बिपीन कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हे यांनी केला.
तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायतींच्या विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला, त्या प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.  सरपंच योगिता सुरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. उपसरपंच दीपक चौधरी यांनी प्रास्ताविक करून गेल्या वीस वर्षांपासून धारणगाव रहिवाशांना छोटय़ा छोटय़ा नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागले, असे सांगून येथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे राहिलेले वीस टक्के काम नऊ वर्षांत पूर्ण करता आले नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहेत.
या प्रसंगी सभापती मच्छिंद्र केकाण, दगुराव चौधरी, मारुतराव चौधरी, अंबादास लक्ष्मण देवकर, बाजीराव रणशूर, पंचायत समिती सदस्य सुनील देवकर, जिल्हा परिषद सदस्य नंदाताई भुसे यांची भाषणे झाली.
बिपीन कोल्हे  म्हणाले की, संघटित झाल्याशिवाय पाटपाण्याचा लढा सुटणार नाही. ऊर्ध्व गोदावरी खो-याच्या लाभक्षेत्रात आता नव्याने पाणी साठवायचे असेल तर त्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा परवानगीचा आदेश निघाला असताना येथील लोकप्रतिनिधी गप्प आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश घोडेराव यांनी केले. धारणगाव प्राथमिक शाळेतील संगणक संचाचे सभापती मच्छिंद्र केकाण यांच्या हस्ते या वेळी उदघाटन करण्यात आले.
या प्रसंगी संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष विलास वाबळे, संचालक राजेंद्र नरोडे, पथाजी देवकर, अप्पासाहेब दवंगे, बाळासाहेब वक्ते, निवृत्ती बनकर, शिवाजीराव कदम, सोपानराव पानगव्हाणे, दीपक गायकवाड, बाळासाहेब पानगव्हाणे, मोहनतात्या वाबळे, पोपटराव पगारे, गटविकास अधिकारी एस. के. पुरनाळे, जिल्हा परिषदेचे माजी प्रतोद केशवराव भवर यांच्यासह धारणगाव पंचक्रोशीतील मान्यवर हजर होते. गावास पिण्यासाठी पाणी देणा-या दिलीप जाधव यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.
धारणगावला २३ लाखांचा पीकविमा
बिपीन कोल्हे यांनी शेतक-यांना पीकविमा भरा म्हणून वारंवार सूचना दिल्यामुळेच धारणगावातील ४४१ खातेदारांना २३ लाख १५ हजार ८०३ रुपयांचा पीकविमा मिळाला, त्याबद्दल सोसायटी पदाधिका-यांनी व गावक-यांनी बिपीन कोल्हे यांचा सत्कार केला.