शिक्षा झालेल्या दोषी आमदार व खासदारांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बाजूला सारत केंद्रीय मंत्रिमंडळाने काढलेला दोषींना पात्र ठरविणारा वटहुकूम खेदजनक आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक पां. भा. करंजकर यांनी व्यक्त केली आहे.
यामुळे देशात भ्रष्टाचार व गुन्हेगारीला उत्तेजन मिळू शकते. याविरोधात जनतेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करून निषेध केला पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या देशात राज्यकर्ते गुन्हेगारीला संरक्षण देत असून हे कृत्य महाभयंकर आहे. देशाला अराजकतेकडे नेणारे आहे. या दोषी लोकप्रतिनिधींचे वेतन व निवृत्तिवेतन बंद केले तरी ते पदांचा गैरवापर करून मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचारातून अधिक मालमत्ता व पैसा जमा करतील हे उघड आहे. भ्रष्ट, दुष्ट अपप्रवृत्तींची साखळी व संगनमत हे ज्वलंत द्योतक आहे. लोकशाहीत सर्वोच्च असलेल्या विधानसभा व लोकसभेत गुन्हेगारांना बसण्यास अधिकृत मान्यता देणारा हा वटहुकूम आहे.
तेव्हा यावर बंधन घालणारे अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाची किती आवश्यकता आहे हे यामधून अधोरेखित झाले आहे. स्वत:च्या आदर्शाची नीती आणि कायद्याची भीती असली तरच देशाला उच्चतम भविष्य प्राप्त होईल, याचे भान राज्यकर्ते व लोकप्रतिनिधींनी ठेवले पाहिजे, असे करंजकर यांनी नमूद केले आहे.