दुकानासमोर आडवी लावलेली दुचाकी गाडी बाजूला काढण्यावरून झालेल्या भांडणात दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने व त्यांच्या समर्थकांनी चर्मकार बंधूंना बेदम मारहाण केली. आमदार माने यांनी चावाही घेतला. विरोधी गटाकडून झालेल्या मारहाणीत आमदार माने व त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांनाही दुखापत झाली आहे. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास नव्या पेठेतील पारस इस्टेट येथे हा प्रकार घडला. या घटनेमुळे नव्या पेठेत सकाळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून त्यानुसार पोलिसांनी आमदार दिलीप माने, त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने, बंधू नगरसेवक जयकुमार माने, नगरसेवक नागेश ताकमोगे तसेच चर्मकार पिता-पुत्रांसह चार जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यापैकी नगरसेवक नागेश ताकमोगे (वय ३८) व माने यांच्या मोटारीचा चालक रामचंद्र धोंडिबा शास्त्रे (वय ४९, रा. कुमठे, सोलापूर) यांच्यासह विरोधी गटातील जालिंदर राणू मग्रुमखाने (वय ६२, रा. अभिषेक नगर, पुणे रस्ता, सोलापूर) व त्यांचा मुलगा रवी (वय २४) यांना दुपारी अटक करण्यात आली.
यासंदर्भात भारत जालिंदर मग्रुमखाने (वय ३२) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मग्रुमखाने यांची पारस इस्टेटमध्ये स्टाईल फूट वेअर व संगम फूट वेअर अशी पादत्राणांच्या विक्री व दुरूस्तीची दोन दुकाने आहेत. सकाळी पावणेदहाच्या सुमारास जालिंदर मग्रुमखाने हे संगम फूट वेअरमध्ये नाष्टा करीत बसले असताना दुकानाबाहेर रस्त्यावर चार चाकी मोटार आली. तेव्हा गाडीतील तरुणाने दुकानासमोर लावलेली स्कुटी गाडी बाजूला काढण्यास सांगितले असता जालिंदर मग्रुमखाने यांच्याशी त्याचे भांडण झाले. त्या वेळी त्यांची मुले भारत व रवी हे दोघे तेथे आले असता भांडण वाढले. त्या वेळी त्या तरूणाची गच्ची पकडली असता, मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला दाखवितो, असे धमकावत तो तरूण निघून गेला. नंतर आसपासच्या व्यापारी व नागरिकांनी तो तरूण आमदार दिलीप माने यांचा मुलगा पृथ्वीराज माने असल्याचे सांगितले. दरम्यान, याच कारणावरून राग मनात धरून थोडय़ाच वेळात नगरसेवक नागेश ताकमोगेनी तीन-चार साथीदारांसह तेथे येऊन मग्रुमखाने बंधूंना मारहाण सुरू केली. त्या पाठोपाठ आमदार दिलीप माने हेदेखील तीन-चार साथीदारांसह तेथे आले आणि काहीही न विचारता त्यांनी मग्रुमखाने बंधूंवर हल्ला केला. आमदार माने यांनी आपल्या हातातील धातूच्या टोकदार रॉडने भारत मग्रुमखाने याच्या डोक्यात प्रहार केला. त्याचा प्रतिकार करीत असताना इतरांनी लाकडी स्टूलने व लाथाबुक्क्य़ांनी मारहाण केली. यात डोक्याला,तोंडाला, उजव्या कानाजवळ, दोन्ही पायांवर जबर मार लागला. नंतर आमदार माने यांच्यासह इतरांनी मग्रुमखाने यांच्या दोन्ही दुकांनाची नासधूस करून तीन लाखांचे नुकसान केले. त्यानंतर आमदार माने यांचे बंधू नगरसेवक जयदीप (जयकुमार) माने हे आपले साथीदार घेऊन आले. त्यांनी पुन्हा मग्रुमखाने बंधूंवर हल्ला केला.
याउलट, आमदार माने यांचा मोटारचालक रामचंद्र शास्त्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शास्त्रे हे सकाळी पृथ्वीराज माने यांचे कपडे शिवायला टाकण्यासाठी पारस इस्टेटमध्ये फेव्हरीट टेलर दुकानात गेले होते. तेथे शेजारीच संगम फूट वेअरसमोर चार चाकी गाडी पुढे नेताना संगम फूट वेअरचे मालक मग्रुमखाने यांची स्कुटी गाडी रस्त्यावर आडवी लावली होती. ती गाडी बाजूला घ्या, अशी विनंती केली असता मग्रुमखाने यांनी नकार दिला. तेव्हा स्वत: पृथ्वीराज माने यांनी आपल्या गाडीतून खाली उतरून मग्रुमखाने यांची स्कुटी गाडी बाजूला काढली असता मग्रुमखाने यांनी दुकानाच्या बाहेर येऊन पृथ्वीराज माने यांच्याशी भांडण काढले. त्या वेळी त्यांच्या मुलांनी व नोकराने पृथ्वीराज माने यांना शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर आमदार दिलीप माने हे झाल्या प्रकाराबद्दल विचारणा करण्यासाठी आले असता त्यांनाही मग्रुमखाने पिता-पुत्रांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात त्यांच्या उजव्या हाताला, तर त्यांचे पुत्र पृथ्वीराज माने यांच्या पायाला व हाताला दुखापत झाली आहे. त्यांच्यावर धनराज गिरजी धर्मादाय रुग्णालयात उपचार सुरू होते.
संग्रहित लेख, दिनांक 5th Aug 2013 रोजी प्रकाशित
आमदाराने चर्मकाराचा चावा घेतला हल्ल्यात आमदार पिता-पुत्र जखमी
दुकानासमोर आडवी लावलेली दुचाकी गाडी बाजूला काढण्यावरून झालेल्या भांडणात दक्षिण सोलापूरचे काँग्रेसचे आमदार दिलीप माने व त्यांच्या समर्थकांनी चर्मकार बंधूंना बेदम मारहाण केली. आमदार माने यांनी चावाही घेतला.

First published on: 05-08-2013 at 01:54 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla biting to cobbler brothers mla injured with his son in attack