शहरातील विकासकामांशी संबंधित प्रकरणांचा महापालिका प्रशासन कित्येक महिने होऊनही निपटारा करीत नसल्याने जनतेच्या रोषाला सत्ताधारी मनसेच्या नेत्यांना सामोरे जावे लागत असल्याची तक्रार करीत सोमवारी नवनिर्वाचित संपर्कप्रमुख अविनाश अभ्यंकर यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. रखडणाऱ्या कामांविषयी दर आठ दिवसांनी पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन त्याची जबाबदारी संबंधितांवर टाकली जाणार आहे. याशिवाय, पुढील दहा दिवसात प्रभागनिहाय पाहणी करून खुद्द संपर्कप्रमुख आढावा घेणार आहेत. या घडामोडी पालिका प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिला नसल्याचे दर्शवीत असून आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आता संपर्कप्रमुख अशी सत्ताबाह्य केंद्रे पालिका अधिकाऱ्यांकडे जाब विचारीत असल्याने प्रशासनातही अस्वस्थता पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या मनसेने विविध मार्गाने हातपाय मारण्यास सुरुवात केली आहे. पालिकेतील सत्ता हाती येऊन सव्वा दोन वर्षांचा कालावधी लोटूनही विकासकामे झाली नसल्याची शहरवासीयांची भावना आहे. या नाराजीचा फटका लोकसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराला बसला. आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संघटनात्मक पातळीवर काही बदल करून महापौर व नगरसेवकांना कार्यप्रवण होण्याचे निर्देश दिले आहेत. नाशिकच्या संपर्क प्रमुखपदाची धुरा अविनाश अभ्यंकर यांच्यावर सोपविण्यात आली. त्यांनी नगरसेवकांचा अभ्यासवर्ग घेऊन कार्यप्रवण होण्याचे सूचित केले. या घडामोडी सुरू असताना सोमवारी अभ्यंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रामायण बंगल्यात पालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली. या वेळी महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्यासह पालिकेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
शहरात महापौर व नगरसेवक चांगले काम करण्याचा प्रयत्न करतात. तथापि, प्रशासन कार्यक्षम नसल्याने सत्ताधाऱ्यांची अनेक कामे रखडून पडल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले. विकासकामांशी संबंधित फाइल्स कित्येक महिने पुढे सरकत नाही. नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यास दाद दिली जात नाही. शहरवासीयांची कामे मार्गी न लागल्यास मनसेचे नेते व महापौरांना उत्तरे द्यावी लागतात. ही कामे रेंगाळण्यात पालिकेचा अधिकारीवर्ग तितकाच जबाबदार आहे, या निष्कर्षांप्रत मनसेचे नेतेमंडळी आली आहे. या पाश्र्वभूमीवर, अभ्यंकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. पुढील काळात दर आठ दिवसांनी पालिका अधिकाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाणार आहे. म्हणजे, त्या त्या विभागाच्या अखत्यारीतील प्रश्नांची स्थिती, प्रगती यांचा आढावा घेतला जाईल. एखादे काम रखडल्यास त्याची जबाबदारी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर टाकली जाईल, असे बजावण्यात आले.
महापालिकेत आधीपासून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे विकासकामांविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते. आता संपर्कप्रमुख या नात्याने अभ्यंकर यांच्या प्रश्नांना पालिका अधिकाऱ्यांना तोंड द्यावे लागले आणि लागणार आहे. या सत्ताबाहय़ केंद्रांमार्फत अंकुश ठेवण्याच्या प्रकाराने पालिका अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे मळभ दाटले आहे. विकासकामे न होण्यामागे प्रकरणे रखडवत ठेवणारी पालिकेची प्रशासकीय यंत्रणा तितकीच जबाबदार असल्याचे दर्शविण्यासाठी मनसेने हा पवित्रा स्वीकारला आहे. दरम्यान, संपर्कप्रमुखांकडून पुढील दहा दिवसांत प्रभागनिहाय दौरा करून विकासकामांचा आढावा घेतला जाणार आहे.