एरव्ही मोठ-मोठय़ा रोख रकमा, टीव्ही व फ्रीझ यासह इतर इलेक्ट्रॉनिक किंवा गृहोपयोगी वस्तूंची बक्षिसे स्पर्धेतील विजेत्या संघांना आयोजकांच्या वतीने दिली जातात, पण पारितोषिक म्हणून जिवंत बोकड आणि कोंबडय़ा आणि त्याही मुंबईत दिल्याचे ऐकिवात नसेल. आगरी सेवा संघाने मात्र मुंबईत आयोजित कबड्डी स्पर्धेसाठी अशाप्रकारची बक्षिसे ठेवली आहेत. मुंबईत प्रभादेवी येथे आयोजित स्पर्धेत ही पारितोषिके देण्यात येणार आहेत.
सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात समाजाचे अस्तित्व दाखविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९३७ मध्ये आगरी सेवा संघाची स्थापना करण्यात आली. मुंबई शहरातील प्रभादेवी, वरळी, कोळीवाडा भट्ट चाळ, नेहरूनगर, सदानंद वाडी, चुनाभट्टी, घाटकोपर, मुलुंड आणि विक्रोळी या परिसरात आगरी समाजाचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी आगरी सेवा संघ कार्यरत असतो. दरवर्षी संघाच्या वर्धापनदिनानिमित्ताने महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यंदा संघाचा ७८ वा महोत्सव साजरा होणार असून त्यानिमित्ताने प्रभादेवी येथील राजाभाऊ देसाई उद्यानात येत्या १३ ते २० डिसेंबर ‘ब’ गटाच्या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी उद्यानात कै. नारायण नागु पाटील नगरी उभारण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी २० संघ दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, यातील विजेत्या संघाला कै. कुणाल प्रकाश पाटील चषक आणि जिवंत बोकड, तर अंतिम पराभूत संघास चषक व दहा जिवंत कोंबडय़ा असे बक्षीस देण्यात येणार आहे.