नवी मुंबई पालिका प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या अनुदानाच्या खैरातीवर पोसल्या जाणाऱ्या परिवहन उपक्रमाचा प्रवास अधोगतीच्या दिशेने सुरू असल्याने या सर्व उपक्रमाची झाडाझडती पालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड तुर्भे येथील मुख्य आगाराला भेट देऊन घेणार आहेत. प्रशासनाने दिलेल्या अनुदानावर उपक्रमाचा आतापर्यंतचा डोलारा उभा असून आतापर्यंत १०० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे तरीही प्रशासन या उपक्रमाच्या उतरणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
नवी मुंबई पालिका परिवहन उपक्रमात सद्य:स्थितीत ३६० गाडय़ा असून हा उपक्रम गेली काही महिने तोटय़ात सुरू आहे. हा तोटा आता महिन्याकाठी तीन कोटींच्या घरात गेला असून तो दिवसेंदिवस वाढणार आहे. त्याला अनेक कारणे असून लोकसत्ताच्या महामुंबई वृत्तान्तने त्यावर बुधवारी प्रकाश टाकला आहे. त्यामुळे आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्याकडे विचारणा केली असून मंगळवारी सर्व लेखा शीर्षकांची माहिती घेतली जाणार आहे. साहित्य खरेदी-विक्री मक्तेदारी, कंत्राटी ठोक पगारावर असलेले फुकट फौजदार कामगारांचे या वेळी सेवा अहवाल तपासले जाणार आहेत. आयुक्त यानंतर या उपक्रमाकडे जातीने लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकीय इच्छेने सुरू करण्यात आलेले काही मार्ग यापूर्वी आयुक्तांनी रद्द करून आपल्या कणखरपणाची चुणूक दाखविली आहे. यानंतर अशा प्रकारे तोटय़ात जाणाऱ्या मार्गावर कायमची फुल्ली मारण्यासाठी सर्व मार्गाचे सव्र्हेक्षण एका खासगी संस्थेला देण्यात आले असून यानंतर आयआयटीद्वारेदेखील हे सव्र्हेक्षण करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. त्यामुळे राजकीय लाभापोटी उरण, पनवेल, खोपोली येथे गाडय़ा हाकण्याचा नाद काही सदस्यांनी सोडून द्यावा लागणार आहे. उपक्रमातील वार्षिक कामात अनेक वर्षे काही कंत्राटदारांची मक्तेदारी असून काही अधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे. भाडेवाढीला न देण्यात येणारी परवानगी ही या उपक्रमाच्या अधोगतीमागील प्रमुख कारणे असली तरी उपक्रमातील भ्रष्टाचार, सभापतिपदाची संगीत खुर्ची, कंत्राटराज यासारख्या बाबीदेखील कारणीभूत आहेत. त्यांची तपासणी आयुक्त आता दर महिन्याला करणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2014 रोजी प्रकाशित
पालिका आयुक्त एनएमएमटीची झाडाझडती घेणार
नवी मुंबई पालिका प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या अनुदानाच्या खैरातीवर पोसल्या जाणाऱ्या परिवहन उपक्रमाचा प्रवास अधोगतीच्या दिशेने सुरू
First published on: 24-12-2014 at 09:34 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Municipal commissioner tol grill nmmt