शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी आपले शहर सोडून इतर मोठय़ा शहरात जाणाऱ्यांची जंत्री दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरहून मुंबई नाही, पण पुण्याची वाट पकडणाऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळेच नागपूर ते पुणे हा प्रवास दिवसेंदिवस अधिक जवळ होत चालला आहे. विमानाने अवघ्या तासाच्या आत हे अंतर पार होत असले तरीही रेल्वे आणि बसचा प्रवास मात्र कितीतरी तासांचा आहे. तरीसुद्धा नागपूर-पुणे-नागपूर असा प्रवास करणाऱ्यांची गर्दी दररोज वाढत आहे. विमानाने जाणे परवडणारे नाही आणि रेल्वेचे तिकीट बुकिंग हव्या त्या तारखेला मिळत नाही, याचा फायदा घेऊन खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्यांचे तिकीट भाडे दुपटीने वाढवले आहेत.
नागपूर ते पुणे किंवा पुण्याहून नागपूर असा प्रवास करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी हे विद्यार्थीच असतात. उन्हाळयाच्या सुटय़ा लागताच घरी परतायची घाई या प्रत्येकच विद्यार्थ्यांला असते. विमानाचा प्रवास त्यांना परवडणारा नसतो. परीक्षा आणि सुटय़ांच्या तारखा निश्चित नसल्याने रेल्वेचे तिकीटसुद्धा काढून ठेवता येत नाही. अशावेळी ऐनवेळी घरी परतण्याचा एकमेव मार्ग हा ट्रॅव्हल्सचाच असतो. नेमका याचाच फायदा गेल्या काही वषार्ंत या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी घेतल्याचे दिसून येते.
उन्हाळ्याच्या दिवसात राज्य परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करणे कठीण असते. त्यामुळे थंड हवेत झोप घेत घरी परतण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सशिवाय पर्याय नसतो. एरवी ७०० ते ८०० रुपये असलेले खासगी ट्रॅव्हल्सचे भाडे उन्हाळयात मात्र ६० टक्क्यांपासून तर १०० टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून येते.
या संदर्भात काही खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांशी संवाद साधला असता तिकीट दरातील ही तफावत डोळे विस्फारणारी ठरली. एका खासगी कंपनीने एसी स्लीपर कोचचे दर १४०० रुपये, दुसऱ्या एका कंपनीने १५०० रुपये तर आणखी एका कंपनीने तब्बल १६५० रुपये प्रवास भाडे प्रवाशांकडून आकारण्याचे धोरण सुरू केले आहे.
उन्हाळा आणि दिवाळी अशी वर्षांतून दोनदा होणारी त्यांची दरवाढ परवडणारी नसली तरीही प्रवाशांना पर्याय नाही. नागपूरहून पुण्याकरिता राज्य परिवहन महामंडळाची निमआराम सेवा आहे, पण तिकीट दर अधिक आणि सुविधा कमी अशी त्यांची स्थिती असल्याने प्रवासी तिकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत.
लांब पल्ल्याच्या या प्रवासाकरिता ११०० ते १२०० रुपये मोजण्याऐवजी खासगी बसेसचा पर्याय त्यांना अधिक सोयीचा वाटतो. याचा फायदा खासगी बस व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. त्यांच्या भाडेआकारणीवर सध्या कुणाचेही नियंत्रण नसल्याने ही लूट होत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 27th May 2015 रोजी प्रकाशित
नागपूर-पुणे प्रवास दुपटीने महाग, खासगी ट्रॅव्हल्सकडून प्रवाशांची लूट
शिक्षण, नोकरी, व्यवसायासाठी आपले शहर सोडून इतर मोठय़ा शहरात जाणाऱ्यांची जंत्री दिवसेंदिवस वाढत आहे.
First published on: 27-05-2015 at 08:25 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur pune travel doubled expensive