सर्चच्या निर्माण शिबिरात मॉं दंतेश्वरी रुग्णालयात गर्भाशयाशी संबंधित आजाराने पीडित अतिदुर्गम भागातील ३३ महिला रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यातील एका महिलेच्या पोटातून ३ किलो मासाचा गोळा काढून तिला जीवदान देण्यात आले. या शिबिराच्या निमित्ताने अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांना गर्भाशयाच्या विविध आजारांची माहिती देण्यात आली.
धानोरा तालुक्यातील सर्च येथे अतिदुर्गम भागातील आदिवासींसाठी दरवर्षी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षीही विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, गोंदिया व चंद्रपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करून गर्भाशयाशी संबंधित विविध आजारावर मार्गदर्शन व शस्त्रक्रिया शिबीर ७ व ८ डिसेंबरला आयोजित केले होते. यात एकूण ३३ महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हे रुग्ण होते. या ३३ रुग्णांपैकी काहींना गंभीर स्वरूपाचा त्रास होता. रुग्णांना हा सर्व त्रास अंगावर सहन करावा लागत होता. शस्त्रक्रियेद्वारा त्यांना यातून मुक्ती मिळाली असून एका रुग्णाच्या पोटात असलेला तीन किलो वजनाचा मासाचा गोळा शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढून महिलेला जीवदान देण्यात आले.
पुढील आठ दिवसांसाठी रुग्णांना रुग्णालयातच ठेवण्यात आले आहे. त्या साऱ्यांना आरोग्य कार्यक्रमाची माहिती देऊन आरोग्य शिक्षणही दिले जाणार आहे. शस्त्रक्रियेनंतर घ्याव्या लागणाऱ्या काळजीकरिता डॉ.राणी बंग यांनी मार्गदर्शन केले.
शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथून आलेले स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.आशिष कुबडे यांनी स्त्रियांमध्ये अशा आजाराचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असून तो झाल्याची लक्षणे दिसताच न लाजता ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन उपचार करणे सुरू करणे गरजेचे आहे. याबाबत रुग्ण व नातेवाईकांना माहिती देण्यात आली. ग्रामीण भागातील स्त्रिया बऱ्याचदा असा आजार झाल्यावर कुणालाही न सांगता त्रास सहन करतात.  त्रास असह्य़ झाल्यावर उपचारासाठी येतात, असे डॉक्टरांनी सांगितले. शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथून आशिष कुबडे, अकोला येथील डॉ.दीपक वखारिया, गोदिया येथून डॉ.कार्तीक लांजे, डॉ.मंगला घिसाड हे स्त्री रोगतज्ज्ञ उपस्थित होते. भूलतज्ज्ञ डॉ.दीपक भट, डॉ.किशोर पाचोरकर, डॉ.संजीवनी लांजेवार, श्याम इरूडकर आदी उपस्थित होते. निर्माण शिबिरातील मदतीकरिता आलेले डॉ. धनंजय मारोडे, डॉ.रोहित गणोरकर, डॉ.समीक्षा मुरकुटे, आशंका मामीडवार शिबिरात सहभागी झाले होते, तसेच स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.राणी बंग यांच्यासह डॉ.मृणाल, डॉ.योगेश कालकोंडे, डॉ.वैभव तातावार, डॉ.ऐश्वर्या रेवडकर, मॉ दंतेश्वरी रुग्णालयाच्या परिचारिका, प्रयोगशाळा तज्ज्ञ कार्यरत होते.